सिंगलच राहणे मला पसंत
भाभी जी घर पर है या मालिकेद्वारे घरोघरी अंगूरी भाभी म्हणून ओळख निर्माण केलेली शिल्पा शिंदे ‘बिग बॉस 11’ आणि स्टँडअप कॉमेडी शो ‘गँग्ज ऑफ फिल्मिस्तान’मध्ये दिसून आली आहे. अनेक वर्षांपूर्वी तिने अभिनेता रोमित राजसोबत साखरपुडा केला होता, परंतु काही कारणास्तव दोघांचा विवाह होऊ शकला नव्हता. अभिनेत्रीने अलिकडेच सिंगल असण्यातच आनंदी असल्याचे म्हटले आहे.
विवाह न करण्याच्या निर्णयाबद्दल तिचे ठाम मत आहे. रिलेशनशिपमध्ये नसणे मला फारसे जाणवत नाही. मी माझ्या आयुष्यात कुठल्याही व्यक्तीला जोडीदार म्हणून पाहू शकत नसल्याचे तिने म्हटले आहे.
रोमित राजसोबत साखरपुडा झाला तेव्हा मी तशी कमी वयाची होते. त्यावेळी देखील मला संसार थाटावा असे वाटत नव्हते. परंतु भोवतालच्या व्यक्तींना विवाह करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे वाटले. त्यानंतर रोमित आणि माझे जमले नाही आणि नाते तुटले. माझा साखरपुडा मोडल्यावर मी आणखीन एका नातेसंबंधात राहिले, परंतु तो अनुभव खूपच वाईट होता असे शिल्पा सांगते.
या वाईट अनुभवानंतर मी आता नात्यांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. सिंगल राहून आनंदी असल्याचे मला जाणवले. मी कुणाबद्दल उत्तरदायी होऊ शकत नाही. सद्यकाळात मी अनेक नाती विखुरताना पाहते. दशकानंतरही ही नाती का टिकत नाहीत हेच मला समजत नाही. माझे कुटुंबीय आजही मी विवाह करावा अशी इच्छा धरून आहेत. परंतु माझ्या आयुष्यात मला कुठलाच जोडीदार नको आहे असे तिने म्हटले आहे.









