महिला सुपर स्मॅश स्पर्धा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज शिखा पांडेने 2024-25 च्या न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या सुपर स्मॅश क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या कॅन्टरबरी मॅजिसियन्स संघाशी नुकताच नवा करार केला आहे.
कॅन्टरबरी मॅजिसियन्स क्लबच्या फ्रांचायझीनी ही घोषणा नुकतीच केली आहे. न्यूझीलंडमधील महिलांच्या सुपर स्मॅश क्रिकेट स्पर्धेत करारबद्ध होणारी शिखा पांडे ही पहिली भारतीय क्रिकेटपटू आहे. सदर टी-20 स्पर्धा गुरुवारपासून सुरू झाली असून ती 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघांचा समावेश आहे. कॅन्टरबरी मॅजिसियन्स संघाचे नेतृत्व लॉरा ह्dयुजेस करीत आहे. शिखा पांडेने यापूर्वी आपला शेवटचा सामना 2023 साली द. आफ्रिकेत झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळला होता. या स्पर्धेत शिखाने तीन सामन्यांतून तीन गडी बाद केले होते. त्यानंतर निवड समितीने शिखाला भारतीय संघातून वगळले. शिखा पांडेने आतापर्यंत टी-20 प्रकारात 62 सामन्यांत 43 गडी तर वनडे प्रकारात 55 सामन्यात 57 गडी बाद केले आहेत.









