गोव्याचा 7 डॅन ब्लॅक बेल्टधारक कराटेपटू
नरेश कृष्णा गावणेकर/फोंडा
कराटे हा एक मार्शल आर्टचा प्रकार असून ती एक प्राचीन युद्ध कला आहे. भारतात मार्शल आर्टला कलारीपयाट्टू , गटका आदी नावाने ओळखले जाते. गोव्यातही कराटे ही कला जोपासली जात असून या क्षेत्रात अनेक कराटेपटूंनी नावलौकीक मिळविले आहे. सेन्साय उदय के. पिल्ले हा कराटेपटू गेली अनेक वर्षे या क्षेत्रात चमकत आहे. नुकताच त्याने कराटेतील 7 डॅन ब्लॅक बेल्ट हा उच्च बहुमान पटकावून ‘शिहान’ (मास्टर इन्स्ट्रक्टर) ही पदवी मिळविली आहे. त्याने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले असून तो प्रमाणपत्र प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच आहे.
फोंडा-गोवा येथील उदय पिल्ले यांनी कराटेतील शिटो-रिव्ह, कलारीपयाट्टू , जपान कराटे शोटोकाय, कराटे असोसिएशन ऑफ इंडिया, ओकीनावा मार्शल आर्ट्स अकादमी, बिनो रिव्ह स्टाईलमध्ये ब्लॅक बेल्ट मिळविले आहेत. कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे ते प्रमाणपत्र प्रशिक्षक व राष्ट्रीय रेफ्रि आहेत. बंगळुरु येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ योग संस्थेचा योग प्रशिक्षक अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे. गेली 30 वर्षे ते कराटेपटूंना प्रशिक्षण देत आहेत. फोंडा, काणकोण, उसगांव, डिचोली, साखळी व कैगा-कारवार तसेच गोव्यातील इतर भागातही ते कराटेचे वर्ग घेतात. कराटेबरोबरच योग, प्राणायाम व मेडिटेशनचे प्रशिक्षणही ते देत असतात.
70 ब्लॅक बेल्ट कराटेपटू केले तयार
त्यांच्या प्रशिक्षणाखाली आजपर्यंत 70 ब्लॅक बेल्ट कराटेपटू तयार झाले आहेत. त्यांचे प्रशिक्षणार्थी मिलीटरी, पोलिस, सुरक्षा विभाग व इतर क्षेत्रात नोकरीला आहेत. गोव्यातील अनेक विद्यालयात तसेच सर्वशिक्षा अभियान अंतर्गत सरकारी हायस्कूलातील विद्यार्थीनींना स्वरक्षण प्रशिक्षण शिबिरे आयोजित करीत असतात. फोंडा येथील नॅशनल फोरेन्सिक इन्स्टिट्यूटमध्येही ते कराटेचे धडे देतात.
ब्रूस ली हे दैवत
कराटेतील दैवत असलेले ब्रूस ली यांना पाहून त्यांना कराटेची आवड झाली. ब्रूस ली वर त्यांची भक्ती आहे. सोळाव्या वर्षापासून त्याने प्रशिक्षक राजू नाईक यांच्याकडे प्रशिक्षण घ्यायला प्रारंभ केला. त्यानंतर ब्रम्हानंद सावर्डेकर (8 डॅन) यांच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घेतले. सिव्हील इंजिनिअरींगचे पदवीकाधारक असलेले उदय पिल्ले यांचे शालेय शिक्षण फोंडा येथील सेंट मेरी हायस्कूलात तर उच्च माध्यमिक शिक्षण जीव्हीएम उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. कराटे प्रशिक्षणाबरोबरच ते आर्किटेक्चरल अॅनिमेशन (थ्रीडी) चा व्यवसाय करीत आहेत. उदयने राष्ट्रीय स्पर्धेत अनेकवेळा गोव्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. सध्या ते राष्ट्रीय स्पर्धेत (ओएमएए) मुख्य रेफ्रि म्हणून काम पाहतात.
मुलींनी स्वरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण घ्यावे
आजच्या युवा पिढीने कराटेचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे असे उदय सांगत असतात. कराटेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य लाभते. खासकरुन मुलींनी हे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. स्वरक्षणासाठी त्यांना हे उपयोगी पडू शकते. त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. कराटेमध्ये ‘डीप ब्रिदिंग’ चा वापर होत असल्याने मेंदू तल्लख होतो. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणातही त्याचा लाभ होतो. वरीष्ठ नागरिकांसाठीही ताणतणाव, इतर आजार दूर करण्यासाठी तसेच फिटनेससाठी कराटेचा फायदा होत असतो असे त्यांचे म्हणणे आहे. उदयने आजपर्यंत गोव्यातील चाळीस विद्यालयात कराटेचे प्रशिक्षण दिले आहे. भविष्यात सर्व विद्यालयात कराटेचे धडे देण्यास ते प्रयत्न करणार आहेत.









