जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना : महिला-बालकल्याण खात्याच्या कार्यालयाला अचानक भेट
बेळगाव : अंगणवाडी केंद्रांमधील मुलांना बसण्यासाठी डेस्क व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. शिवाजीनगर येथील महिला आणि बालकल्याण खात्याच्या कार्यालयाला अचानक भेट देऊन त्यांनी कामाची पाहणी केली. तर भाडेतत्त्वावर असणाऱ्या अंगणवाड्यांचे नजीकच्या प्राथमिक शाळांमध्ये स्थलांतर करण्यात यावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. अधिकाऱ्यांचे हजेरी बुक तपासून विकासकामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व बालविकास योजनाधिकाऱ्यांनी अंगणवाडी केंद्रांची पाहणी करून अहवाल देण्याची सूचना केली. अंगणवाडी केंद्रांची दुरुस्ती, पुनर्निर्माण व सध्याची असलेली अवस्था याबाबतचा अहवाल देण्यात यावा, भाडेतत्त्वाबाबतही माहिती देण्याची सूचना केली. भाडेतत्त्वावर असणाऱ्या अंगणवाड्यांचे सरकारी शाळांमध्ये स्थलांतर करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.
अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्यास अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, प्रत्येक तीन महिन्यांतून अंगणवाडी केंद्रांना भेट देण्यात यावी, मुलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात यावी, कोणताही आजार असल्यास अथवा कुपोषित असणाऱ्या मुलांची माहिती घेऊन एनआरसी, एमएनआरसीकडे द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमधील बालविकास सल्ला समितीची सभा घेण्यात यावी. या सभेला गर्भवती महिलांना बैठकीला हजर राहण्याचे कळविण्यात यावे. सरकारच्या योजनांची माहिती करून देण्यात यावी. सरकारी योजनांची जागृती करून त्यांचा लाभ मिळवून देण्यात यावा. अंगणवाडीतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक शाळेत प्रवेशासाठी प्रोत्साहित करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी महिला आणि बालविकास खात्याचे उपसंचालक बसवराज ए. एम., अधिकारी रेवती होसमठ, जिल्ह्यातील तालुकास्तरीय शिशु विकास अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.









