शेवया-सांडगे वाळत घातल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल : जिल्हाधिकाऱयांची सुवर्णसौधला भेट देऊन पाहणी

प्रतिनिधी /बेळगाव
हलगा येथील सुवर्ण विधानसौधसमोर शेवया वाळत घातल्यासंबंधीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सरकारी यंत्रणेला खडबडून जाग आली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी सुवर्णसौधला भेट देऊन पाहणी केली.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनीही या प्रकरणाची चौकशी केली असून सुवर्ण विधानसौधच्या प्रवेशद्वारासमोर शेवया वाळत घातल्या होत्या, ही गोष्ट खरी आहे. कंत्राटदारांनी यासंबंधात पत्र दिले आहे. एका कामगार महिलेच्या चुकीमुळे ही गोष्ट घडल्याचे सांगत सारवासारव करण्यात आली आहे.
कोंडसकोप्प येथील एक कामगार महिलेला कामावरून कमी करून अधिकाऱयांनी आपली जबाबदारी झटकली आहे. खरेतर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी आहे. यापुढे असे प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या साहाय्यक कार्यकारी अधिकाऱयांनी कंत्राटदाराला दिला आहे. यासंबंधीचे पत्र प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनीही सुवर्ण विधानसौधला भेट देऊन अधिकारी व कामगारांशी चर्चा केली आहे. शेवया व सांडगे वाळत घातलेल्या महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी अधिकाऱयांना केली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी सुरक्षेचाही आढावा घेतला.
हिवाळी अधिवेशनासाठी 400 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्चून सुवर्ण विधानसौध उभारण्यात आले आहे. शेवया आणि सांडगे वाळत घातल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. तोपर्यंत या इमारतीकडे कोणीच कसे फिरकले नाहीत? सुरक्षा आणि देखभाल करण्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च केला जातो. ही यंत्रणा कुठे होती? असा प्रश्न उपस्थित केला जात असून नकळत या इमारतीसमोर शेवया वाळत घातलेल्या महिलेला कामावरून काढण्यापेक्षा अधिकाऱयांवर कारवाईची मागणी केली जात आहे.









