भाजपला मोठा धक्का : पुढील भूमिकेविषयी आज निर्णय
वार्ताहर/ हुबळी
माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी शुक्रवारी भाजपमधून बाहेर पडत काँग्रेस प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी देखील शनिवारी रात्री राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपला निवडणूक काळात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आपण हुबळी-धारवाड सेंट्रलमधून निवडणूक लढविणारच असा पुनरुच्चार शेट्टर यांनी केला असून अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी की दुसरा पर्याय निवडावा, याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून रविवारी निर्णय घेईन, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. बहुतेक ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
रविवारी सकाळी शिरसी येथे विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांची भेट घेऊन आमदारपदाचा राजीनामा देईन. त्यानंतर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असणारे शेट्टर हे देखील प्रभावी लिंगायत नेते आहे. त्यांना तिकीट न दिल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपच्या लिंगायत मतांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीतील चर्चा निष्फळ
त्यामुळे शनिवारी रात्री शेट्टर यांची समजूत काढण्यासाठी भाजप राज्य निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई त्यांची हुबळीतील निवासस्थानी भेट घेतली. मात्र, शेट्टर स्वत: निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे चर्चा निष्फळ ठरली.
भाजप हायकमांडने जगदीश शेट्टर यांना राजकीय निवृत्तीचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी स्पष्ट नकार देत निवडणूक लढविणारच अशी भूमिका घेतली. भाजपच्या दोन्ही उमेदवार यादीमध्ये नाव नसल्याने जगदीश शेट्टर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कार्यकर्त्यांमार्फत दबाव, दिल्लीत भाजपाध्यक्ष जे. पी. न•ांची भेट घेतल्यानंतरही भाजपने तिकीट देण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे त्यांनी भूमिका निश्चित करण्यासाठी जगदीश शेट्टर यांनी शनिवार सकाळी हुबळीत समर्थकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी रात्री 8:30 पर्यंत वरिष्ठांना अल्टिमेटम दिला होता.
40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील काळा दिवस : शेट्टर
आपल्याला भाजप नेत्यांनी दिलेल्या वागणुकीमुळे धक्का बसला आहे. एका ज्येष्ठ नेत्याला अशी वागणूक दिली जात असेल तर काय करावे, हेच समजत नाही. आपण मुख्यमंत्रिपद, उच्च पद मागितलेले नाही. जनतेची संधी करण्यासाठी आमदार म्हणूनच काम करणार असल्याची विनंती केली आहे. मात्र, वरिष्ठांनी संमती दर्शविली नाही. आपल्या 40 वर्षातील राजकीय कारकिर्दीतील हा काळा दिवस आहे, अशा शब्दात शेट्टर यांनी नाराजी उघड केली.









