यमकनमर्डी पोलिसात घटनेची नोंद
बेळगाव : पाच्छापूर (ता. हुक्केरी) येथील शेतवडीत दगडाने ठेचून एका मेंढपाळाचा खून करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून यमकनमर्डी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. रायाप्पा सुरेश कमती (वय 28) राहणार हट्टीआलूर, ता. हुक्केरी असे त्या दुर्दैवी मेंढपाळाचे नाव आहे. गुरुवार दि. 8 मे रोजी दुपारी पाच्छापूरजवळ त्याने बकऱ्यांचा कळप नेला होता. सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास शेतवडीत खून झालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रायाप्पाचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत आहेत.









