फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम : लॉरेन्झो मुसेटी, जस्मिन पावोलिनी यांचीही विजयी सलामी
वृत्तसंस्था/ पॅरिस
येथे सुरू झालेल्या प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत बेन शेल्टनने विजयी प्रारंभ केला. लॉरेन्झो मुसेटी, टॉमी पॉल, टायफो, महिलांमध्ये एरीना साबालेन्का, जस्मिन पावोलिनी, झेंग किनवेन यांनीही दुसरी फेरी गाठली आहे.
13 व्या मानांकित अमेरिकेच्या शेल्टनने लॉरेन्झो सोनेगोवर 6-4, 4-6, 3-6, 6-2, 6-3 असा पाच सेट्सच्या लढतीत पराभव करून दुसरी फेरी गाठली. सलग दुसऱ्या ग्रँडस्लॅममध्ये त्याने सोनेगोवर विजय मिळविला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत त्याने सोनेगोला हरविले होते.
अन्य सामन्यात आठव्या मानांकित लॉरेन्झो मुसेटीने पात्रता फेरीतून आलेल्या जर्मनीच्या यानिक हन्फमनचा 7-5, 6-2, 6-0 असा पराभव केला. मुसेटीने मागील तीन मास्टर्स स्पर्धेत किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. रोम, माद्रिद व माँटे कार्लो स्पर्धेत त्याने अंतिम फेरी गाठली होती. गेल्या वर्षी विम्बल्डनमध्ये त्याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण अन्य एकाही ग्रँडस्लॅममध्ये त्याला उपांत्यपूर्व फेरीही गाठता आली नव्हती. अमेरिकेच्या टॉमी पॉल व फ्रान्सेस्को टायफो यांनीही दुसरी फेरी गाठली. 12 व्या मानांकित टॉमी पॉलने डेन्मार्कच्या बिगरमानांकित एल्मर मोलरचा 6-7 (5-7), 6-2, 6-3, 6-1 असा पराभव केला तर 15 व्या मानांकित टायफोने रोमन सफिउल्लिनवर 6-4, 7-5, 6-4 अशी मात केली. अलीकडे झालेल्या रोम मास्टर्स स्पर्धेत पॉलने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
राफेलचा गौरव
स्पर्धा सुरू होण्याआधी फ्रेंच ओपन स्पर्धा विक्रमी 14 वेळा जिंकणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. त्याला स्पेशल ट्रॉफी भेट देण्यात आली. यावेळी त्याचे जुने प्रतिस्पर्धी नोव्हॅक जोकोविच, रॉजर फेडरर, अँडी मरे त्याला निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
महिला एकेरीत अग्रमानांकित साबालेन्काने कॅमिला रखिमोव्हाचा 6-1, 6-0 असा धुव्वा उडवित दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. साबालेन्काने पाच बिनतोड सर्व्हिस करताना दोन ब्रेकपॉईंट्सही वाचविले. साबालेन्काने आतापर्यंत तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून दोन वर्षांपूर्वी तिने येथे उपांत्य फेरी गाठली होती. मागील वर्षीच्या उपविजेत्या चौथ्या मानांकित जस्मिन पाओलिनीला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. तिने युआन युईचा 6-1, 4-6, 6-3 असा पराभव केला. ऑलिम्पिक चॅम्पियन चीनच्या झेंग किनवेननेही दुसरी फेरी गाठली असून तिने 2021 ची उपविजेती अॅनास्तेशिया पावल्युचेन्कोव्हावर 6-4, 5-3 अशी मात केली.









