वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
एटीपी आणि डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या वॉशिंग्टन खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अमेरिकेच्या बेन शेल्टनने तसेच महिलांच्या विभागात इमा राडुकेनु तसेच कॅनडाची लैला फर्नांडीज यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या बेन शेल्टनने आपल्याच देशाच्या फ्रान्सीस टिफोईचा 7-6 (7-2), 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. आता अमेरिकेचा टेलर फ्रित्झ आणि स्पेनचा फोकिना यांच्यातील विजयी खेळाडू बरोबर शेल्टनचा उपांत्य फेरीचा सामना होईल. पुरुष विभागातील अन्य एका सामन्यात कोरेंटीन मॉटेटने रशियाच्या मेदव्हेदेवला 6-1, 6-4, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरने जपानच्या नाकाशिमाचा 6-4, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या विभागात कॅनडाच्या लैला फर्नांडीस तसेच इमा राडुकेनु यांनी एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. राडुकेनुने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या मारिया सॅकेरीचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. तत्पूर्वी राडुकेनुने जपानच्या ओसाकाचा 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता. अमेरिकेच्या वयस्कर व्हिनस विल्यम्सचे या स्पर्धेतील आव्हान पोलंडच्या फ्रेचने 6-2, 6-2 असे संपुष्टात आणले. तब्बल 16 महिन्यानंतर व्हिनसचे टेनिस क्षेत्रात या स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन झाले होते. कॅनडाच्या लैला फर्नांडीजचा उपांत्य फेरीचा सामना तृतिय मानांकित इलीना रायबाकिनाशी होणार आहे.









