योगी सरकारच्या बुलडोझरने युपीतील माफियागिरी चिरडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे येथील अनेक माफियांनी याचा धसका घेतला आहे. त्यातच अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्ररफची लाईव्ह हत्या झाल्याने, अनेक गुन्हेगारांनी युपीला रामराम ठोकला आहे. यावेळी या गुन्हेगारांनी महाराष्ट्र आणि गोव्यात आश्रय घेतला आहे. तर काहींनी कर्नाटकातील निवडणुकीच्या रणधुमाळीचा फायदा उचलत याठिकाणी ओळख लपवून राहण्यास सुरुवात केल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. यामुळे या गुन्हेगारांना शोधणे महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्ररफ याचा खात्मा झाल्यानंतर अनेक गुन्हेगारानी उत्तर प्रदेशला रामराम ठोकला आहे. माध्यमासमोर ही सरळ-सरळ हत्या असली तरी याला युपी पोलिसांची फूस असल्याचा वास या गुन्हेगारांना आला आहे. युपी पोलिसांची फूस म्हणजेच योगी सरकारचा माफियावर चालविलेला बुलडोझर असल्याचा संशय या गुन्हेगाराना आला आहे. यामुळे अनेक गुन्हेगारांनी युपीला रामराम ठोकत महाराष्ट्र आणि गोव्यात आश्रय घेतला आहे. तर नेमकी याची चाहूल राज्य पोलीस त्यातल्या त्यात मुंबई पोलिसांना लागल्याने, त्यांनी गोवा पोलिसांनादेखील सतर्क केले आहे. तर दुसरीकडे कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असल्याने, या ठिकाणी देखील गुन्हेगारांनी ठाण मांडल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
अतिक अहमदच्या हत्येमुळे काही सराईत गुन्हेगार तसेच अतिक अहमदचे शत्रुत्व असलेल्या गुन्हेगारांनी उत्तर प्रदेशात पुन्हा जाण्यासाठी रीघ लावली आहे. मात्र या ठिकाणी योगीचा बुलडोझर असल्याने, त्याखाली विनाकारण चिरडू जाऊ नये, यासाठी काही गुन्हेगारांनी युपी सोडण्यावर भर देत ते भूमिगत झाले आहेत. तर अनेकांनी राज्यातील मुंबई-पुणे या शहरात आश्रय घेतला आहे. तर काहींनी पर्यटकांसाठी पंढरी असलेल्या गोव्यात आश्रय घेतला आहे. याठिकाणी पर्यटक म्हणून अथवा कोणतेही काम केले तर कोणाला संशय येणार नाही, असे वागणे या गुन्हेगारांनी सुरु केले आहे. मात्र युपीतून अनेक सराईत गुन्हेगार रातोरात गायब झाल्याने, युपी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) देशातील सर्व राज्य पोलिसांना सतर्क केले आहे. याचा परिपाक म्हणजे मुंबई पोलिसांनी शहरात सर्वत्र शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच शहरात ऑल आऊट
ऑपरेशन देखील राबविण्यास सुरुवात केली आहे.
ज्याप्रकारे युपीमध्ये माफियांचे कंबरडे मोडण्यास युपी पोलिसांनी सुरुवात केली आहे. अगदी तशाच प्रकारचे कंबरडे मुंबई पोलिसांनी 90 च्या दशकात अंडरवर्ल्डचे मोडले होते. देशातील सर्वात मोठे गुन्हेगारांचे जाळे हे मुंबईतून चालत होते. यावेळी दाऊद इब्राहीम, छोटा राजन यांच्यात फूट पडून खुलेआम गँगवॉर सुरु झाला होता. मुंबईच्या रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा खच पडत असे. सामान्य मुंबईकर आपला जीव मुठीत धरुन जगत होता. कधी कोठून गोळी येईल, आणि जीव जाईल हे सांगता येत नव्हते. त्यातच अनेक राजकीय नेत्यांचे मुडदे देखील या टोळ्यांनी पाडले होते. यामुळे मुंबईकरांचा प्रत्येक दिवस हा दहशतीखाली जात होता. नेमके यादरम्यान म्हणजे 1994-95 साली भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले होते. शहरातील गँगवॉर आणि सराईत गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी या सरकारने मुंबई पोलिसांना पूर्ण अधिकार दिले. नेमके या अधिकाराचा वापर करीत मुंबई पोलिसांनी एन्काउंटर नावाचे ब्रम्हास्त्र बाहेर काढले. दाऊद असो की छोटा राजन या टोळीतील कोणीही गँगस्टर दिसला तरी त्याचा एन्काउंटर करण्याचा धडाका मुंबई पोलिसांनी सुरु केला. त्यादरम्यान, एकाच वर्षात जवळपास शंभरहून अधिक गँगस्टरांचा खात्मा मुंबई पोलिसांनी केला. यामुळे याचा मोठा धसका यावेळी तत्कालीन गँगस्टरानी घेतला. ज्याप्रमाणे, सद्यस्थितीत युपीतील गुन्हेगारांनी तेथून पळ काढला आहे. अगदी त्याप्रकारे मुंबईतील गुन्हेगारांनी त्यावेळेस मुंबई बाहेर आश्रय घेण्यास सुरुवात केली होती.
मात्र, ज्याप्रकारे पोलिसांना अमर्यादित अधिकार दिले गेले, नेमके त्याच दरम्यान, या अधिकाराचा अनेकवेळा काही अधिकाऱयांनी गैरवापर करण्यास सुरुवात केली. यावेळी अनेक निरपराधांवर अंडरवर्ल्ड गँगस्टरचे लेबल लावत त्यांचा खात्मा म्हणजे डालग्यातील एन्काउंटर करण्यास सुरुवात केली. यातील प्रमुख म्हणजे 2002 साली झालेल्या घाटकोपर बॉम्बस्फोटातील ख्वाजा युनुस हत्या प्रकरण चांगलेच गाजले. तसेच लखन भैय्या बनावट चकमकीने तर संपूर्ण देशांत धुमाकुळ घातला. यामुळे मानवाधिकार आयोगाने तत्काळ न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. यामुळे अनेक पोलीस अधिकाऱयांना अटक झाली. तर अनेकांना निलंबित करण्यात आले. स्वतःच्या फायद्यासाठी या अधिकाऱयांनी एन्काऊंटर नावाच्या शस्त्राचा गैरवापर केला असल्याचे निष्पन्न झाल्याने, राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या एन्काउंटर शस्त्राची धारच काढून घेतली. मुंबई शहरातील शेवटचा एन्काउंटर 1 नोव्हेंबर 2010 साली झाला. गँगस्टर अश्विन नाईक याचा खास हस्तक मंगेश नारकर याला तत्कालीन पोलीस अधिकारी अरूण चव्हाण, श्रीपाद काळे आणि नंदकुमार गोपाळे यांनी ठार केले होते. त्यानंतर तब्बल 13 वर्षे उलटून गेली तरी एकही एन्काउंटर मुंबईत झाला नाही. तसेच 90 च्या दशकातील गँगवॉर देखील मुंबईत राहिला नाही.
मात्र या शस्त्राचा अवलंब योगी सरकारने करीत, युपी पोलिसांना अमर्याद अधिकार दिले आहेत. अतिक अहमदच्या मुलाचा एन्काउंटर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात अतिकची हत्या झाली. मात्र, ही हत्या नसून, युपी पोलिसांनी घडवून आणलेला गुन्हेगारांच्या हातुन गुन्हेगाराचा खात्मा असल्याचा संशय देखील व्यक्त होत आहे. मात्र याचे बालंट सरकारवर फुटू नये, यासाठी योगी सरकारने त्यादरम्यान, डयुटीवर असलेल्या 17 पो]िलसांना तत्काळ निलंबित केले होते. अतिकच्या लाईव्ह हत्येमुळे अनेक गुन्हेगार आनंदित झाले, मात्र त्यांचा आनंद अगदी क्षणिक असल्याची जाणीव त्यांना झाली. आपला देखील अतिक अहमद होण्याची शक्यता असल्याने, या गुन्हेगारांनी तत्काळ युपीतून पळ काढत देशाची आर्थिक राजधानी मुंबई अ]िण देशाची पर्यटक पंढरी असलेल्या गोव्यात आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची भंबेरी उडू नये याकरीता पोलिसांनी तत्काळ या गुन्हेगारांची शोधमोहीम सुरु केली आहे.









