वीज कर्मचाऱ्यांना वाहनासह रोखले : पोलीस बंदोबस्तात हलविले वाहन
वाळपई : नगरगाव पंचायत क्षेत्रातील शेळप शिंगणे भागात गेले चार दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. रविवारी दिवसभर वीज बंद झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी रात्री उशिरा आलेल्या वीज कर्मचाऱ्यांना गावातील वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत वाहन सोडणार नसल्याचा इशारा देत वाहनासहित अडवून ठेवले. यामुळे सदर वाहन व कर्मचारी गावामध्येच अडकून पडले. सोमवारी सकाळी वाळपई पोलिसांनी बंदोबस्तात कर्मचाऱ्यांना व सदर वाहन जागेवरून हलविले. याबाबतची माहिती अशी की शेळपे शिंगणे भागात गेला महिनाभर विजेचा लपंडाव सुरू आहे. बंचकेबल मध्ये सातत्याने बिघाड होत असल्यामुळे वीज खंडित होते. सदर बिघाड दूर करताना बराच उशीर लागतो. यामुळे ग्रामस्थांना वीजे अभावी रहावे लागते. या भागात अनेकवेळा वीजेचा कमी जास्त दाब येत असल्याने गावातील अनेक ग्रामस्थांची टीव्ही, फ्dरीज, वॉशिंगमशीन, पंखे व इतर विजेवर चालणारी उपकरणे जळून गेली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.
शनिवारी संध्याकाळी वीज गुल झाली. ग्रामस्थांना रविवार विजेभावी काढावा लागला. अनेकवेळा फोन केल्यानंतर खात्याचे कर्मचारी रविवारी रात्री उशिरा आले. मात्र वीजपुरवठा सुरळीत करण्यास अपयशी ठरले. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना व वाहन येथून सोडणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. दरम्यान, अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी येऊन ग्रामस्थांशी चर्चा करणार असे सांगितले. मात्र अधिकारी गावात फिरकले नसल्याने सदर कर्मचारी व वाहन रोखून धरले. रात्रभर सदर वाहन व कर्मचारी गावामध्ये अडकून होते. सोमवारी सकाळी याची माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांनी वाळपई पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी त्यांची सुटका केली. मात्र सोमवारी संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. शेळप शिंगणे या भागात घातलेले बंच केबल हे निकृष्ट दर्जाचे आहेत. यामुळे सातत्याने विजेचा लपंडाव होतो. या गावात निर्माण होणारी वीज समस्या दूर करण्यासाठी स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
लोकांची गैरसोय दूर करण्याची मागणी
सोमवारी संध्याकाळपर्यंत गावातील वीजपुरवठा पूर्वपदावर आलेला नव्हता. एका बाजूने सरकार 24 तास विनाखंडित वीजपुरवठा देणार असल्याची घोषणा करते. तर दुसऱ्या बाजूने सत्तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही चार चार दिवस वीजपुरवठा खंडित होतो. सरकारने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून येथील लोकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









