पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्याकडून चौकशीचा आदेश : पोलीस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांच्याकडे चौकशीची सूत्रे
प्रतिनिधी / पणजी
बाणस्तारी अपघात प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्यावर हे प्रकरण शेकणार, अशी चिन्हे दिसत आहेत. पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी गावडे यांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. पोलीस मुख्यालयातील अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांच्याकडे चौकशीची सूत्रे देण्यात आली आहेत.
आम आदमी पार्टीचे गोवा प्रमुख अड. अमित पालेकर आणि गणेश लमाणी यांना बाणस्तारी अपघात प्रकरणात सहआरोपी करण्यात म्हार्दोळ पोलीस अपयशी ठरले. कायद्याने आवश्यक असतानाही त्यांना सहआरोपी करण्यात आले नाही. त्यांना जामीन देतानाही न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याची चौकशी होण्यासाठी आता गावडे यांची चौकशी केली जाणार आहे.
म्हार्दोळ पोलिसांवर संशय
म्हार्दोळ पोलिसांनी बाणस्तारीचे अपघात प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. तपासाच्या हालचाली लगेच केल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर सुरुवातीपासूनच संशय व्यक्त करण्यात येत होता. म्हणून नंतर या प्रकरणाचा तपास क्राईम बँचकडे सोपविण्यात आला. एकंदरीत तपासकामात म्हार्दोळ पोलिसांनी त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षकाची चौकशी
पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्याकडे हे प्रकरण पोहोचले तसेच प्रसार माध्यमांतूनही मोठी टीका होऊन त्यात म्हर्दोळ पोलिसांनी प्रकरणाकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे समोर आल्यामुळे सिंग यांनी शेवटी म्हार्दोळ पोलीस निरीक्षकांचीच चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
अपघातात तीन ठार, तीन जखमी
बाणस्तारी अपघातात तीनजणांचे विनाकारण बळी गेले. तसेच तिघेजण गंभीर जखमी होऊन कायमचे जायबंदी झाले. असा हा भीषण अपघात झाल्यानंतर त्यातील कारचालक कोण होता? यावरून संशय निर्माण झाला. कारचालक महिला होती असा काही प्रत्यक्षदर्शीचा दावा होता. याबाबत म्हार्दोळ पोलिसांना देखील नेमके सत्य काय? याबाबत सांगता आले नाही. कारचालक कोण याचा उलगडा ते करू शकले नाहीत. त्यामुळे तपासात संभ्रम निर्माण झाला. म्हणूनच तपासाची सूत्रे क्राईम ब्रँचकडे देण्यात आली.
अपघाताची प्रकरणे सहसा उच्च न्यायालयात जात नाहीत. तथापि हे प्रकरण तेथे पोहोचले, कारण अपघातास कारणीभूत असलेल्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले. त्या न्यायालयात याचिका सादर करण्यात आल्यानंतर सुनावणी करताना मेघना सावर्डेकर यांना रु. 2 कोटी जमा करा, असा आदेश न्यायालयाने दिला आणि ती रक्कम जमा झाल्यानंतर बळी पडलेल्या कुटुंबांना, जखमींना नुकसान भरपाई म्हणून वितरित करण्यात आली. एवढ्यावर हे प्रकरण संपलेले नाही. आता त्याचा उलटा प्रवास सुरू झाला असून म्हर्दोळ पोलीस निरीक्षक गावडे यांची चौकशी करण्याची पाळी पोलीस खात्यावर आली आहे.









