वृत्तसंस्था/ बेंगळूर
महिला प्रीमियर लीगच्या बेंगळूर येथे रविवारी झालेल्या लिलावात गुजरात जायंट्सने मोठी झेप घेताना सिमरन शेखला 1.9 कोटी रुपयांना करारबद्ध केले. त्यासरशी रविवारी सायंकाळी ती सर्वांत महागडी खेळाडू ठरली. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरातच्या संघात तिच्यासाठी बोलीयुद्ध पेटले. त्याभरात 5 लाख रुपयांच्या मूळ किमतीवरून 1.9 कोटी रुपयांपर्यंत बोली गेली. स्पर्धेच्या सुरुवातीच्या हंगामात सिमरन शेख गुजरातसाठी नऊ सामन्यांत खेळली होती.
गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने राष्ट्रीय संघातर्फे खेळण्याची अद्याप संधी न मिळालेल्या खेळाडूंपैकी प्रेमा रावतला 1.2 कोटी रुपयांना करारबद्ध केले. दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी यांच्यात या खेळाडूसाठी बोलीचे युद्ध झाले. शेवटी आरसीबीने तिला आपल्या बाजूने आणण्यात यश मिळविले. प्रेमाने तीन सामन्यांत चार बळी घेत उद्घाटनाची उत्तराखंड प्रीमियर लीग मसुरी थंडर्सला जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावली होती.
तसेच 20 वर्षीय फिरकीपटू एन. चरणीला दिल्ली कॅपिटल्सने 55 लाख रुपयांना करारबद्ध केलेले आहे तर मुंबई इंडियन्सने 16 वर्षांच्या जी. कमलिनीला 1.6 कोटी रुपयांना करारबद्ध केले. कमलिनीचे नाव समोर येताच मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनी 10 लाख रुपयांची बोली मांडली. दिल्ली कॅपिटल्ससोबत त्यांचे नंतर बोली युद्ध होऊन पुढे कमलिनीसाठीची बोली 1.6 कोटी रुपयांपर्यंत वाढली आणि मुंबईच्या संघात तिचे स्थान निश्चित झाले.
कमलिनीने तामिळनाडूसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांना ऑक्टोबरमध्ये झालेली 19 वर्षांखालील स्पर्धा जिंकण्यास मदत करताना आठ सामन्यांमध्ये 311 धावा काढल्या. तसेच भारत ‘ब’ विरुद्ध दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यातील तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात तिने सर्वाधिक 79 धावा केल्या होत्या. या शानदार फॉर्ममुळे कमलिनीला पुढील आठवड्यात होणाऱ्या 19 वर्षांखालील आशिया चषकासाठी भारतीय संघात निवडले गेले आहे.
गुजरात जायंट्सने वेस्ट इंडिजची क्रिकेटर दिआंद्रा डॉटिनला 1.7 कोटी रुपयांना करारबद्ध केले असून तिच्यासाठी यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्सही प्रयत्नरत होते. वॉरियर्सने त्यापोटी 1.2 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती. तथापि, गुजरातने तिला संघात सामील करून घेण्यात यश मिळविले.
दुसरीकडे, नंदिनी कश्यपला नवीन संघ मिळाला असून तिला दिल्ली कॅपिटल्सने रु. 10 लाखांना करारबद्ध केले आहे. या लिलावात 91 भारतीय आणि 29 परदेशी क्रिकेटपटू अशा 120 खेळाडूंचा समावेश असून राष्ट्रीय संघातर्फे खेळण्याची संधी न मिळालेले 82 भारतीय, तर 8 परदेशी खेळाडू आहेत.









