कोल्हापूर सोलापूर महामार्गावर सर्वांनी अनुभवला सुखद क्षण.
डिचोली/प्रतिनिधी
कोल्हापूर सोलापूर महामार्गावरील पाचेगाव उदनवाडी येथे पायी वारी दरम्यान धनगर बांधवानी आपल्या मेंढय़ाकरवी “याची डोही याची डोळा रिंगण” घालून समस्त वारकरी बांधवांचे डोळय़ांचे पारणे फेडले.यावेळी पांडुरंगासह बाळू मामांचा साक्षात्कार झाला.आणि आपोआपच बाळू मामाच्या नावानं चांगभलं हाही जयघोष भक्तीभावात उच्चारला.
मानवी वारकऱयांच्या त्यात बरोबरीने या पशुप्राणी यांच्या कडूनही वारकरी संप्रदायात ज्या रिंगण सोहळय़ाला जे महत्त्व आहे ते रिंगण काल शुक्रवारी (दि. 8 जुलै रोजी) श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय गोवा या संस्थेची पायी वारी चालताना कोल्हापूर सोलापूर महामार्गावरील पाचेगाव उदनवाडी येथे समस्त वारकऱयांच्या डोळय़ादेखत या मेंढय़ाकडून रिंगण घालण्यात आले. हे रिंगण काही वारकऱयांनी प्रथमच पाहिले. हा पायी वारीदरम्यानचा एक वेगळा आनंद लुटला.
त्यानंतर ज्ञानेश्वर वारकरी संप्रदाय यांच्यावतीने या धनगर बांधवांचा प्रमुख प्रतिनिधी सुरेश पठारे यांचा वारीचे अध्यक्ष देवानंद नाईक व पदाधिकारी, वारकरी यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला. व या धनगर बांधवांना समृद्धी लाभू दे यासाठी पांडुरंग चरणी जयघोष केला.









