वादळी वारा-गडगडाटासह पाऊस
बेळगाव : वादळी वारा व प्रचंड गडगडाटासह बुधवारी सायंकाळी हलगा, बस्तवाड परिसरात पावसाने हजेरी लावली. वाऱ्याने शाळा खोल्या व घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तर एका घरावर झाड कोसळले आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. बुधवार दि. 11 जून रोजी सायंकाळी 4 नंतर विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे बस्तवाड येथील कन्नड प्राथमिक शाळेवरील पत्रे उडून गेले. शाळा सुटल्यानंतर ही घटना घडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. देवाप्पा फकिरा पाटील यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. या घटनेने वृद्ध दाम्पत्याचा संसार उघड्यावर पडला आहे. बस्तवाड येथील संतोष पिराजी मन्नोळकर यांच्या घरावर झाड कोसळल्याने नुकसान झाले आहे. सांबरा, मुतगा, निलजी, बसवण कुडची परिसरातही पावसाचा जोर होता. पावसामुळे परिसरात पाणी साचले होते.









