महिला पोलीस हवालदाराचे कौतुक
बेळगाव : शाळकरी मुलांना महामार्ग ओलांडण्यासाठी महामार्गावरील वाहतूक रोखून त्या मुलांना रस्ता पार करण्यास मदत करणाऱ्या हिरेबागेवाडी पोलीस स्थानकातील एका महिला पोलीस हवालदाराचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे. हवालदार श्रीमती ए. आर. शिंगाडी या होयसळ वाहनावर कर्तव्यावर होत्या. हिरेबागेवाडी गावाजवळच गस्त घालताना शाळकरी मुले महामार्ग ओलांडत होती. मात्र, महामार्गावरील वाहतुकीमुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. ही गोष्ट लक्षात घेऊन महिला पोलीस हवालदाराने वाहतूक रोखली व शाळकरी मुलांना सुखरूपपणे रस्ता पार करून दिला. याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी त्या महिला पोलीस हवालदाराचे कौतुक केले आहे.









