आपले ध्येय साध्य करण्यासाठी किंवा परिस्थितीया रेट्यामुळे माणसाला अनेकदा जगावेगळे निर्णय घ्यावे लागतात, हे आपल्याला ज्ञात आहे. अमेरिकेच्या रोड आयलँडस् येथे वास्तव्यास असणारी 38 वर्षीय महिला कॉनी स्टोवर्स यांच्या संदर्भात असाच प्रसंग घडला आहे. त्यांनी केवळ आपल्या पतीलाच सोडले असे नव्हे, तर नोकरीचाही त्याग केला. त्यांनी आपल्या जुन्या जीवनशैलीचाच त्याग केला. तथापि, हे निर्णय त्यांना का घ्यावे लागले, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरवर पाहता स्टोवर्स यांचे आयुष्य अतिशय आखीव रेखीव असेच होते. त्यांच्याकडे एक लठ्ठ वेतनाची नोकरी, पती, एक कन्या असा सारा आदर्श परिवार होता. तथापि, अशा आदर्श वातावरणातही त्यांचे मन संसारात रमत नव्हते. त्यांना मनातून कोठेतरी एक मोठी पोकळी जाणवत होती. त्यामुळे सर्व भौतिक सुखे हाताशी असताना त्यांना ती नकोशी झाली होती. याला कारण होता 2020 चा भीषण स्वरुपाचा कोरोनाचा उद्रेक. या काळात त्यांना घरातून नोकरी करावी लागली. अनेक महिने घरात काढल्याने त्यांना मद्यपानाचे व्यसन लागले. तसेच अतिखाण्याचीही सवय लागली. घरातच दिवस काढावे लागल्याने व्यायामही म्हणावा तसा करता येईनासा झाला. त्यामुळे त्यांचे वजन प्रचंड वाढले. त्यामुळे त्यांना नैराश्याने घेरले. जीवनात काही अर्थ उरला नाही, असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी विरंगुळा म्हणून रोलर कोस्टरचा खेळ शिकून घेतला. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी जुने जीवन पूर्णत: त्यागण्याचा निर्णय घेतला. याचसाठी पती, कन्या आणि संसाराचा त्यांनी त्याग केला. केवळ आपले वजन कमी करण्याचाच त्यांनी ध्यास घेतला. त्यानंतर दोन वर्षांच्या काळात त्यांनी तब्बल 100 पौंड वजन घटविले आहे. आता त्यांना आपला पुनर्जन्म झाला असे वाटत आहे. कोरोना काळात अनेकांवर घरातून कामे करण्याची वेळ आली. त्यामुळे व्यसनाधीनता वाढली. अनेकजण नैराश्याचा आजाराचे सावज झाले. अशांसाठी स्टोवर्स यांची नवी जीवनशैली ही एक प्रेरणा आहे. त्यांना यामुळे प्रसिद्धही भरपूर मिळाली आहे. तसेच त्यांनी आपला गमावलेला आनंद पुन्हा प्राप्त केला, असे त्यांचे म्हणणे आहे.









