ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अॅलीसा हिलीची नियुक्ती केल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे. ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लेनिंगने क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्याने अॅलीसा हिलीची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आता ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी हिलीवर टाकण्यात आली आहे. चालू महिन्याच्या अखेरिस ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि यजमान भारत यांच्यात एकमेव कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला 21 डिसेंबरपासून मुंबईत प्रारंभ होईल. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन महिला संघाची घोषणा करण्यात आली. गेल्या जूनपासून इंग्लंड, आयर्लंड आणि विंडीज विरुद्धच्या झालेल्या मालिकांमध्ये अॅलीसा हिलीकडे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. अष्टपैल्यू ताहिला मॅकग्रा ऑस्ट्रेलियन संघाची उपकर्णधार म्हणून राहिल. ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या बिग बॅश लिग टी-20 स्पर्धेत दोन वेळेला अजिंक्यपद मिळवून देणाऱ्या अॅडलेड स्ट्रायकर्स संघाचे नेतृत्व मॅकग्राकडे होते.
33 वर्षीय हिलीकडे ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपविले जाईल, अशी अपेक्षा होतीच. यापूर्वी तिने आपल्या तब्बल 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये उपकर्णधारपद यशस्वीपणे सांभाळले होते. आता ती भविष्यकाळात ऑस्ट्रेलियन संघाला पुन्हा अग्रस्थानावर कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. पुढील वर्षी बांगलादेशमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हिलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला होता.
ऑस्ट्रेलियन संघ : डार्सि ब्राऊन, लॉरेन चिटेली (केवळ कसोटीसाठी), ग्रॅहॅम, गार्डनर, किम गॅरेथ, ग्रेस हॅरिस (टी-20 साठी), अॅलीसा हिली (कर्णधार), जोनासेन, अॅलेना किंग, लिचफिल्ड, ताहिला मॅकग्रा (उपकर्णधार), बेथ मुनी, इलिसी पेरी, मेगान स्कूल, सुदरलँड, वॉरहेम (सर्व प्रकारांसाठी).









