6 जणांना मरणोत्तर मिळाला पुरस्कार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या एका सोहळय़ात अनेक शूरवीरांना शौर्य चक्राने गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सशस्त्र दलांच्या 13 जवानांना शौर्यचक्राने सन्मानित केले आहे. यातील 6 जणांना हा पुरस्कार मरणोत्तर मिळाला आहे. गूप कॅप्टन वरुण सिंह यांना 2020 मध्ये एका उड्डाणादरम्यान स्वतःच्या एलसीए तेजस लढाऊ विमानाला वाचविण्यासाठी शौर्य चक्राने (मरणोत्तर) गौरविण्यात आले.
सीआरपीएफचे हेड कॉन्स्टेबल कुलदीप कुमार उरावत यांना त्यांनी दाखविलेल्या शौर्यासाठी शौर्य चक्राने (मरणोत्तर) गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी हुतात्मा कुलदीप यांच्या पत्नीला हा पुरस्कार प्रदान केला आहे.
204 कोब्रा सीआरपीएफचे हेड कॉन्स्टेबल अजित सिंह यांना मरणोत्तर ‘शौर्य चक्रा’ने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी अनिता देवी यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला आहे. याचबरोबर 204 कोब्रा सीआरपीएफ कॉन्स्टेबल विकास कुमार यांच्या पत्नी नंदिनी देवी आणि आईने राष्ट्रपतींकडून शौर्य चक्र (मरणोत्तर) स्वीकारले आहे. एसपीओ शाहबाज अहमद यांना मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. शाहबाज यांचे वडिल अब्दुल अजीज यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.
सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे यांना परमविशिष्ट सेवा पदकाने यावेळी गौरविण्यात आले. या सोहळय़ाला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.









