पंतप्रधानांची जागतिक सक्रियता ही देशाची देशाची मोठी ताकद असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्साह आणि ऊर्जा अवर्णनीय आहे. त्यांनी ‘सिंदूर’ अभियानानंतर जगभरात भारताचा पक्ष मांडण्याचा जो झपाटा दाखविला, त्यामुळे विश्वसमुदायाकडे दहशतवादाच्या विरोधात एक प्रखर संदेश देण्यात भारत यशस्वी ठरला आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे केरळमधील खासदार आणि नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा स्तुतिसुमने उधळली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच अथकपणे काम करतात. त्यांना अधिक पाठिंबा मिळण्याची आवश्यकता आहे. देशहिताची कामे करण्यामागची त्यांची कळकळ कौतुकास्पद आहे. ‘सिंदूर’ अभियानानंतर त्यांनी ज्या पद्धतीने जगाशी संवाद साधला, त्यातून भारताच्या बाजूने वातावरणनिर्मिती झाली. त्यांच्या प्रयत्नांना सर्वांनी देशहित लक्षात घेऊन अधिक पाठींबा देण्याची आवश्यकता आहे. ‘सिंदूर’ अभियानानंतर भारताचे त्यांच्या पुढाकारात सर्वपक्षीय शिष्टमंडळे अनेक देशांमध्ये पाठविली. त्यामुळे सारा भारत दहशतवादाविरोधात एकत्र आहे, हे जगाला समजले. तसेच दहशतवादाविरोधात संघर्ष करण्याचा निर्धार आणि निश्चय साऱ्या भारताचा आहे, हे साऱ्या जगासमोर स्पष्ट झाले. त्यांनी योग्य तेच केले आहे, असे प्रतिपादन शशी थरूर यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्रात एका लेखात लिहिले आहे.
संघर्षानंतर मुत्सद्दीपणातही सरस
‘सिंदूर’ अभियानाच्या माध्यमातून पाकिस्तानला प्रचंड धडा शिकविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सॉफ्ट पॉवर’ किंवा धोरणीपणाचा परिचय देत, आक्रस्ताळी भाषा टाळली. त्यांनी मुत्सद्देगिरीचा उपयोग केला. भारताच्या कार्यवाहीसंबंधी कोणत्या देशाच्या मनात काही शंका असतील तर त्यांचे निराकरण करण्यात यश मिळविले. भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांना विदेशांमधून मिळालेला प्रतिसाद हेच दर्शवितो, असे थरूर यांनी त्यांच्या लेखात आवर्जून स्पष्ट केले आहे.
देशाच्या एकात्मतेचे बळ
भारताने पाठविलेल्या शिष्टमंडळांमध्ये सर्व पक्षांच्या खासदारांचा समावेश होता. केवळ सत्ताधारी पक्षाचे सदस्य नव्हते. यामुळे राष्ट्रीय महत्वाच्या प्रसंगी देश कसा एकत्र येतो, याचे दर्शन घडले. एकात्मतेचे हे बळ या सौहार्द अभियानातून जगालाही कळून आले. भारताचे विदेश धोरण हे एकाच पक्षाची मक्तेदारी नसून ते सर्वपक्षीय आणि सर्वसमावेशक असल्याचा संदेशही जगात गेला. पाकिस्तानला शस्त्रबळाचा धडा शिकविण्याइतकेच, जगाशी संपर्क करून त्याला या संघर्षातील भारताची बाजू पटवून देण्याचे कार्य महत्वाचे होते. ते या सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या माध्यमातून करण्याचे राजकीय कौशल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले. ही त्यांची कृती अत्यंत प्रसंशनीय होती, असे प्रतिपादन त्यांनी लेखात केले आहे.
पाकिस्तानला येथेही दिली मात
ज्यावेळी भारताचे शिष्टमंडळ अमेरिकेत होते, तेव्हा पाकिस्तानचेही शिष्टमंडळ तेथे आले होते. तथापि, अमेरिकेचे प्रशासकीय अधिकारी, त्या देशाचे लोकप्रतिनिधी आणि विचारवंत यांनी भारताची बाजू समजून घेण्यात अधिक स्वारस्य दाखविल्याचे दिसून आले. पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला भेटलेले अनेक मान्यवर भारताच्या शिष्टमंडळालाही भेटले. तथापि, त्यांनी भारताच्या म्हणण्याला दिलेला प्रतिसाद पाकिस्तानला दिलेल्या प्रतिसादापेक्षा अधिक उत्साही आणि जिवंत होता. भारताच्या दहशतवादविरोधी संघर्षाला या साऱ्यांनी मनापासून पाठिंबा दिल्याचे त्यांच्या देहबोलीवरून आणि त्यांच्या प्रतिक्रियांवरून सिद्ध होत होते. भारताने कधीही पाकिस्तानशी स्वत:हून संघर्ष उकरुन काढलेला नाही. तसेच पाकिस्तानला विनाकारण कधीही त्रासही देण्याचा प्रयत्न केलेला नाही. पाकिस्तानने मात्र नेहमीच भारताची अकारण कुरापत काढली आहे. पाकिस्तानने आम्हाला त्रास देण्याची बुद्धी सोडून दिल्यास आम्ही आमच्या जनतेच्या हितासाठी अधिक प्रमाणात कार्य करु शकतो, हे आम्ही विदेशी मान्यवरांना पटवून देण्यात यशस्वी ठरलो. त्यामुळे मुत्सद्देगिरीतही आम्ही सरस ठरलो, ही वस्तुस्थिती त्यांनी लेखात मांडली आहे.









