वृत्तसंस्था / विनीपेग (कॅनडा)
येथे झालेल्या 2025 च्या 18 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व युवा तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय तिरंदाजपटूंनी दर्जेदार कामगिरी करताना 8 पदके मिळविली. भारताच्या शर्वरी शेंडेने महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सुवर्णपदक पटकाविले.
महिलांच्या रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात विश्व तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणारी 16 वर्षीय शर्वरी शेंडे ही भारताची तिसरी महिला तिरंदाजपटू आहे. यापूर्वी दीपिका कुमारीने तसेच कोमालिका बारीने असा प्रराक्रम या क्रीडा प्रकारात केला होता. महिलांच्या रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात 20 व्या मानांकीत शर्वरीने कोरिया प्रजासत्ताकच्या तृतिय मानांकीत किम येवॉनचा 10-9 असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. शर्वरीने या क्रीडा प्रकारात उपांत्य फेरीत किम येओनचा 7-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. महिलांच्या 18 वर्षांखालील वयोगटाच्या रिकर्व्ह सांघिक तिरंदाजी प्रकारात कांस्यपदक मिळविणाऱ्या भारतीय संघामध्ये शर्वरीचा समावेश होता. 18 वर्षांखालील वयोगटातील मिश्र सांघिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी गाथा खडके आणि अगास्ते सिंगने चीन तैपेईचा पराभव करत कांस्यपदक मिळविले. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताने आणखी दोन पदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय तिरंदाजपटूंनी एकूण 8 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये चार सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या स्पर्धेत भारताने सहा पदकांची कमाई केली होती. आता विश्व तिरंदाजी युवा चॅम्पियनशिप स्पर्धा 2027 ला अॅन्टेलिया तुर्कीमध्ये होत आहे.









