दिलजीत दोसांझसोबत जमणार जोडी
प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली लवकरच एक चित्रपट दिग्दर्शित करणार असून यात दिलजीत दोसांझ, शर्वरी वाघ, वेदांग रैना आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट पुढीलवर्षी प्रदर्शित होणार आहे. इम्तियाज अलीचा हा चित्रपट प्रेम अन् भावनांनी युक्त कहाणी असेल, जो हृदयस्पर्शी आणि मजेशीर असणार आहे. इम्तियाजने यापूर्वी अमर सिंह चमकीला या चित्रपटाकरता दिलजीतसोबत काम केले होते.
चित्रपटात दिलजीत मुख्य भूमिकेत असेल. त्याच्यासोबत शर्वरी वाघ आणि वेदांग रैना हे कलाकार दिसून येणार आहेत. तर अनुभवी अभिनेता नसीरुद्दीन शाह हे यात वेगळ्या प्रकारची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटात दोन वेगवेगळ्या पिढ्यांची कहाणी दाखविण्यात येणार आहे. याचमुळे आणखी एका अभिनेत्रीची यात वर्णी लागण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 1940 च्या दशकातील फाळणीच्या कालखंडावर आधारित असेल. हा प्रेम आणि उलथापालथीदरम्यान मानवी नात्यांची खोली दाखविणारा असेल. चित्रपटाला ए.आर. रहमान आणि इरशाद कामिल यांचे संगीत लाभेल. चित्रपटाचे चित्रिकरण ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहे. हा चित्रपट इम्तियाजची प्रॉडक्शन कंपनी अन्य भागीदारांसोबत मिळून निर्माण करणार आहे.









