सातारा :
शिवथर (ता. सातारा) येथे काही दिवसापूर्वी स्टेट्स ठेवण्यावरून युवकांच्या दोन गटात भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी तहसिलदार कार्यालयासमोर युवकांच्या दोन गटात राडा होणार होता. शिवथर गावातील युवक इनोव्हा कार घेऊन आले होते. या कारमध्ये धारदार शस्त्र होते. या घटनेची माहिती कर्तव्यावर असलेल्या महिला वाहतूक पोलीस हवालदार अर्चना महावीर मोहिते, वैशाली दत्तात्रय लोखंडे यांना कळली. त्यांनी कारचा पाठलाग करून युवकांना ताब्यात घेतले. यामुळे मोठा अनर्थ टळला. कारमधील तीन युवकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शिवथर गावात काही दिवसापुर्वी व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवण्यावरून युवकांच्या दोन गटात भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून शिवथर गावातील काही युवक शुक्रवारी दुपारी साताऱ्यात आले. रविवार पेठेतील युवकांना ते मारणार होते. त्यांनी रविवार पेठ भाजी मंडई शेजारी असलेल्या पेट्रोल पंप परिसरात कार पार्क केली होती. तिथून ते अंलकार हॉटेलच्या जवळ गेले. ही बाब कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला पोलीस हवालदार अर्चना मोहिते, वैशाली लोखंडे यांना कळली. त्यांनी युवकांकडे चौकशी सुरू केली. तोच युवकांनी काढता पाय घेत कारमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. महिला पोलीस हवालदार अर्चना मोहिते व वैशाली लोखंडे यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु युवकांनी कार थांबवली नाही. तोच पोलीस हवालदार मोहिते व लोखंडे यांनी दुचाकीवरून कारचा पाठलाग केला. कारचा पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच युवकांनी पुन्हा कार तहसिलदार कार्यालय परिसरात आणताच कारला त्यांनी दुचाकी आडवी मारून थांबवले. यावेळी युवकांना कारमधून उतरण्यास सांगितले. परंतु ते काही केल्या तयार नव्हते. यातील एक कारमधून बाहेर येताच कारची तपासणी केली. या कारमध्ये धारदार शस्त्र असल्याचे निदर्शनास आले. यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी येऊन युवकांना ताब्यात घेतले. कारसह धारदार शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, रविवार पेठेतीलही दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांच्याकडून चौकशी केल्यानंतर खरे कारण काय हे समजु शकेल.
- दोन रणरागिणीच्या धाडसाचे कौतुक
तहसिलदार कार्यालय परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण जास्त आहे. ही कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे वाहतुकीचे व्यवस्थापन करताना गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे अवघड होते. असे असताना महिला वाहतूक पोलीस अर्चना मोहिते व वैशाली लोखंडे यांनी जीवाची परवा न करता थेट कारचा पाठलाग करू फिल्मी स्टाईलने युवकांना पकडले. त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.








