ममता सरकारबद्दल संताप व्यक्त : सनातन धर्माची चेष्टा करणारे मोकाट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगाल पोलिसांनी ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर सोशल मीडिया पोस्ट केल्याप्रकरणी 22 वर्षीय इन्स्टाग्राम इन्फ्लुंएसर शर्मिष्ठा पनोलीला अटक केली आहे. कोलकाताच्या गार्डनरीच पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी तिला गुरुग्राम येथून अटक केली. तर आता शर्मिष्ठाच्या बचावासाठी आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण मैदानात उतरले आहेत. शर्मिष्ठा विरोधी कारवाईवरून पवन कल्याण यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसेच भाजप खासदार कंगना रनौतने देखील शर्मिष्ठाचे समर्थन करत तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे.
ऑपरेशन सिंदूरवरून कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठाने स्वत:चे म्हणणे मांडले. काही लोकांना तिचे शब्द आक्षेपार्ह वाटले, यानंतर तिने स्वत:ची चूक मान्य करत व्हिडिओ डिलिट करत माफीही मागितली. असे असतानही पश्चिम बंगाल पोलिसांनी शर्मिष्ठाला अटक केल्याचे पवन कल्याण यांनी म्हटले आहे.
सनातन धर्माची चेष्टा करणाऱ्यांचे काय?
तृणमूल काँग्रेसचे नेते, खासदार सनातन धर्माची चेष्टा करतात, त्यांच्यामुळे लाखो लोकांच्या भावना दुखावल्या जातात, मग त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? आमच्या धर्माला गलिच्छ म्हणणारे तृणमूल नेते मोकाट फिरत आहेत. तृणमूल नेत्यांची माफी कुठे आहे? त्यांना त्वरित अटक का झाली नाही अशी विचारणा पवन कल्याण यांनी केली आहे. धर्मनिरपेक्षता काही लोकांसाठी ढाल आणि इतरांसाठी तलवार नाही. पश्चिम बंगाल पोलिसांकडे पूर्ण देश पाहत आहेत. बंगाल पोलिसांनी सर्वांसाठी न्यायपूर्ण कार्य करावे. मी शर्मिष्ठासोबत उभा आहे पवन कल्याण यांनी म्हटले आहे.
शुभेंदु अधिकारींकडून तृणमूल लक्ष्य
पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनीही शर्मिष्ठाच्या अटकेवरून तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले. तृणमूल काँग्रेसने खास मतपेढीला खूश करण्यासाठी ही कारवाई केली आहे. सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढणाऱ्या तृणमूल नेत्यांवर आतापर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही असे अधिकारी यांनी निदर्शनास आणून दिले.
नेदरलँडच्या खासदाराकडून बचाव
शर्मिष्ठाच्या बचावासाठी नेदरलँडचे खासदार आणि पार्टी फॉर फ्रीडमचे नेते गीर्ट वाइल्डर्स सरसावले आहेत. वाइल्डर्स यांनी शर्मिष्ठाच्या अटकेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान ठरविले आहे. शर्मिष्ठाची मुक्तता होईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनिश्चित करावे असे वाइल्डर्स यांनी म्हटले आहे.









