वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱयावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकला नाही. दरम्यान तो 22 डिसेंबरपासून सुरु होणाऱया ढाक्यातील दुसऱया कसोटीतही उपलब्ध होणार नाही, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेतील पहिली कसोटी जिंकून यजमान बांगलादेशवर आघाडी मिळविली आहे. बांगलादेशच्या दौऱयात झालेल्या वनडे मालिकेत खेळताना रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या अंगठय़ाचे हाड दुखावले गेले होते. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. या दुखापतीवर शर्माने मुंबईतील एका तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेतला आहे. डॉक्टरांनी त्यांला दुसऱया कसोटीत न खेळण्याचा सल्ला दिला आहे. बांगलादेशमधील या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माप्रमाणेच बुमराह, शमी आणि रविंद्र जडेजा दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत. उभय संघातील ही कसोटी मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंर्तगत होत आहे.









