वृत्तसंस्था/ शारजाह
जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या एरिगेसी अर्जुनने शारजाहमधील आपल्या मोहिमेची सकारात्मक पद्धतीने सुऊवात करताना शारजाह मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अझरबैजानच्या एल्ताज सफार्लीचा पराभव केला. भारतीय ग्रँडमास्टर्स अरविंद चिदंबरम आणि पी. इनियान यांनी देखील 52000 अमेरिकी डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत अनुक्रमे भारताच्या भरत सुब्रमण्यम आणि इराणच्या इराणी पौया यांचा पराभव करत विजयी सुऊवात केली.
या तीन भारतीय खेळाडूंशिवाय भारतीय वंशाचे दोन युवा खेळाडू अमेरिकेचा अभिमन्यू मिश्रा आणि सर्वांत कमी मानांकित इंग्लंडचा श्रेयस रॉयल यांनीही अनुक्रमे राजा ऋत्विक आणि कझाकस्तानच्या रिनाट जुमाबायेव्ह याना पराभूत करून विजयांची नोंद केली. अव्वल मानांकित खेळाडूंसाठी हा दिवस कठीण राहिला. कारण त्यापैकी बऱ्याच जणांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. एकूण 44 पैकी केवळ 18 लढतींचा निकाल लागला.
अर्जुनने मात्र खेळाच्या मध्यास एका मोक्याच्या क्षणी सफार्लीच्या त्रुटीचा फायदा घेऊन सामना आपल्या नावावर जमा केला. रिंगणात असलेल्या इतर भारतीयांमध्ये एस. एल. नारायणनला तुर्कीच्या सनाल वहापबरोबरची लढत बरोबरीत सोडवावी लागली, तर यागीझ कान एर्दोगमसने निहाल सरिनला बरोबरीत रोखले. रिंगणातील एकमेव भारतीय महिला ग्रँडमास्टर डी. हरिका हिने आर्मेनियाच्या मॅन्युएल पेट्रोस्यानला बरोबरीत रोखून चांगल्या प्रकारे सुरुवात केली. परंतु यावर्षीच्या टाटा स्टील चॅलेंजरचे विजेतेपद मिळविलेल्या लिओन ल्यूक मेंडोन्साला पोलंडच्या मार्सिन क्रिझानोव्हस्कीकडून पराभूत व्हावे लागले. 88 खेळाडूंच्या या स्पर्धेत आठ फेऱ्या बाकी आहेत.









