वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात नवीन आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारच्या सत्रात सलग घसरणीचे वातावरण राहिल्याचे दिसून आले. यामध्ये बीएसई सेन्सेक्स जवळपास 388 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. सदरचे वातावरण हे जागतिक बाजारांमधील नकारात्मक कल राहिल्याने सेन्सेक्समध्ये मजबूत स्थिती ठेवणाऱया कंपन्यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर मंगळवारी दिवसअखेर मुख्य कंपन्यांमध्ये विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेल यांचे समभाग घसरणीत राहिले होते. बीएसई सेन्सेक्स 388 अंकांनी घसरुन निर्देशांक 58,576.37 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 144.35 अंकांनी प्रभावीत होत 17,530.30 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, विप्रो, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग नुकसानीत राहिले. दुसऱया बाजूला ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पॉवरग्रिड कॉर्प, मारुती सुझुकी आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग लाभासह बंद झाले आहेत.
अन्य घडामोडींचा प्रभाव
शेअर बाजारांमध्ये आगामी काळात चढउतार राहण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. यामध्ये सकारात्मक व नकारात्मक स्थिती राहणार असल्याचे संकेत आहेत. यासह अमेरिकन बॉण्डमध्ये तेजी राहिली आहे. याचाही प्रभाव भारतीय बाजारावर झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
मंगळवारच्या सत्रात भारतीय आयटी क्षेत्रातील समभागात लिलाव झाला आहे. परंतु टीसीएसची कामगिरी पाहिल्यास माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी मजबतू कामगिरी करणार असल्याची अपेक्षा होती. यामध्ये देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी टीसीएसला निव्वळ नफा 7.4 टक्के झाला आहे. याचाही प्रभाव गुंतवणूकदारांवर राहिल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. आशियातील अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी हे नुकसानीत राहिले आहेत. तर चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग लाभासह बंद झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 3.20 टक्क्यांनी वधारुन 101.6 डॉलर प्रति डॉलरवर पोहोचले आहे.








