डॉ. बालाजी राव यांचे प्रतिपादन : लोकमान्य सोसायटीतर्फे स्त्रियांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम : महिलांची आर्थिक क्षेत्रात वेगवान झेप
बेळगाव : शेअर मार्केट, म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे उत्तम पर्याय आहेत. नागरिकांमध्ये शेअर मार्केटविषयी योग्य माहिती नसल्याने आपले आर्थिक नुकसान होईल या भीतीने ते गुंतवणुकीपासून दूर राहणे पसंद करतात. मागील काही वर्षांचा विचार करता स्टॉक व म्युच्युअल फंडमधून नागरिकांना सर्वाधिक परतावा मिळाला असल्याने महिलांनी गुंतवणुकीसाठी हा मार्ग आत्मसात करावा, असे प्रतिपादन अर्थ विषयाचे अभ्यासक डॉ. बालाजी राव यांनी केले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी व एचडीएफसी म्युच्युअल फंड यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्त्रीची आर्थिक झेप’ या कार्यक्रमात ते बोलत होते. महिलांनी म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपला विकास करावा, असे विचार त्यांनी मांडले. व्यासपीठावर श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमितच्या चेअरमन प्रतिभा दडकर, लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, सीईओ अभिजित दीक्षित, रिजनल हेड एम. एन. कुलकर्णी उपस्थित होते.
गुंतवणुकीचे मार्ग म्हणून सोने, प्रॉपर्टी, बाँड, इन्शुरन्स, बँक डिपॉझिट, म्युच्युअल फंड, स्टॉक याकडे पाहिले जाते. इतर पर्यायांचा विचार करता स्टॉक व म्युच्युअल फंड यामध्ये सर्वाधिक परतावा मिळतो. जोखीम जास्त असली तरी तितक्याच पटीने परतावाही मिळतो. या क्षेत्रात जाण्यापूर्वी सखोल अभ्यासाची गरज आहे. बरेच जण इतरांच्या सल्ल्याने जोखीम उचलतात आणि त्यामध्येच त्यांना नुकसान होते. त्यामुळे महिलांनी आपल्या वापरातील वस्तूंच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करून शेअर मार्केटमध्ये सुरुवात करावी, असे त्यांनी सांगितले. त्यांनी मारुती सुझुकी, एमआरएफ, नेस्ले, टायटन, एचडीएफसी, एशियन पेंट्स यासारख्या शेअर्समध्ये काही वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती तर आज किती तरी पटीने परतावा मिळाला असता हे स्पष्ट केले. पंढरी परब यांनी लोकमान्य सोसायटीच्या प्रगतीचा आढावा घेत महिलांच्या कार्याचे कौतुक केले. राजकारणापासून समाजकारणापर्यंत तसेच उद्योगांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर ठरत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीच्या क्षेत्रातही महिलांनी पुढे यावे. लोकमान्य परिवारामध्ये 70 टक्क्यांहून अधिक महिला असून त्या आर्थिक क्षेत्रात वेगवान झेप घेत असल्याचे कौतुक त्यांनी केले. या कार्यक्रमाला लोकमान्य परिवारासह महिला ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. काही महिलांनी गुंतवणूक करताना येणाऱ्या अडचणी डॉ. राव यांना सांगितल्या. समर्पक उदाहरणांच्या साहाय्याने त्यांनी महिलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.









