वृत्तसंस्था/ लंडन
भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकुर 2025 च्या इंग्लिश कौंटी चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत खेळणार असून त्याने या स्पर्धेत खेळणाऱ्या इसेक्स क्लबशी नुकताच नवा करार केला आहे.
इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील डिव्हिजन एकमधील होणाऱ्या 7 सामन्यांमध्ये शार्दुल ठाकुर इसेक्सचे प्रतिनिधीत्व करेल. मुंबई संघातून खेळणाऱ्या 33 वर्षीय शार्दुल ठाकुरने गेल्या 8 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 11 कसोटी, 47 वनडे आणि 25 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. शार्दुल ठाकुर पहिल्यांदाच इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. 2025 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेत तो सध्या नागपूरमध्ये सुरु असलेल्या विदर्भ विरुद्धच्या उपांत्य सामन्यात खेळत आहे. शार्दुलने चालू वर्षीच्या रणजी हंगामात मेघालय विरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रीक साधली होती. तो आता भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी निवड समितीचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने भारताकडून आपला शेवटचा सामना 2023 च्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळला होता. भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान शार्दुल ठाकुरला इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्याने त्याला इंग्लंडमधील खेळपट्ट्या आणि वातावरण याची ओळख होईल. तंदुरुस्ती आणि फॉर्म राखल्यास त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळू शकेल.









