वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमलने आयटीटीएफच्या जागतिक मानांकनात एकदम 54 स्थानांची झेप घेतली असून तो आता 34 व्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सिंगापूर स्मॅश टेटे स्पर्धेत त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती, त्याचा त्याला क्रमवारीसाठी लाभ झाला.
शरथने बराच काळपर्यंत टॉप 50 मध्ये आपले स्थान कायम राखले होते. पण अलीकडच्या काही स्पर्धांत त्याला लवकर पराभव स्वीकारावे लागल्याने त्याची मानांकनात घसरण झाली होती. 41 वर्षीय शरथ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार असून त्याची ही पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. सिंगापूरमधील स्पर्धेत शरथने जागतिक 15 व्या मानांकित डार्को जॉर्गिकचा व नंतर 17 व्या मानांकित इजिप्तचा ओमर अस्सार यांना पराभूत केले होते. ऑलिम्पिकपूर्वी टॉप 16 मध्ये स्थान मिळविण्याचा शरथ प्रयत्न करणार आहे.
सिंगापूरमधील स्पर्धेतून त्याने 400 मानांकन गुण मिळविल्याने त्याला टॉप 50 मध्ये स्थान मिळविता आले. या क्रमवारीत तो भारताचा सर्वोच्च मानांकनप्राप्त खेळाडू असून हरमीत देसाई 65 व्या स्थानावर आहे. हे दोन्ही खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकेरीत खेळणार असून भारतीय संघाने सांघिक विभागात खेळण्याची पात्रताही मिळविली आहे. जागतिक क्रमवारीच्या आधारावर भारतीय टेटे फेडरेशन ऑलिम्पिकमध्ये एकेरीत खेळणाऱ्यांची निवड 16 मे रोजी करणार आहे.









