पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल टाकले आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या समर्थकांनी त्यांचे स्वागत केले आणि ते करण्यासाठी ज्या तातडीने त्यांना देशात पाऊल टाकतानाच अटकेपासून संरक्षण देण्याचे धोरण पाकिस्तानी न्यायालयाने स्वीकारले त्यावरून पुढची दिशा स्पष्ट होतेच. आजचा दिवस जर सही सलामत पार पडला तर नवाज शरीफ यांचे तारे पुन्हा चमकायला लागले आहेत असे मानायला हरकत नाही. पाकिस्तानात लष्कराने गळ्याभोवती आवळलेला फास ढिला होऊन मोकळा श्वास घेण्याची संधी मिळावी म्हणून जागतिक पातळीवरील महाशक्तीच्या हस्तक्षेपाने वैद्यकीय उपचाराचे निमित्त करून ते चार आठवड्यासाठी म्हणून शरीफ देशाबाहेर पडले होते. ते आता चार वर्षानंतरच मायदेशी परतले आहेत. अर्थात मृत्युदंडाच्या शिक्षेपर्यंत ज्या खटल्यांमध्ये शिक्षा लागू शकते असे खटले त्यांच्यावर चालवले जात आहेत. पाकिस्तानी लष्कराला नकोसे झाल्यानंतर त्यांची कारकीर्द संपुष्टात आली आणि इम्रान खान यांना संधी मिळाली. नवाज शरीफ नसल्याने बंधू शहाबाज शरीफ यांना पीएमएल नवाज पक्षाचे आणि देशाचेही नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. कट्टर विरोधक पाकिस्तान पीपल्स पार्टीचे बिलाबल भुत्तो यांच्याशी त्यांची युतीही झाली. अर्थात देशातील दोन मोठ्या शक्ती एकत्र झाल्या तरीसुद्धा त्यांना देश काही चांगल्या पद्धतीने चालवता आला नाही. तीच अवस्था इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील देशाचीही झाली. देशाच्या हितासाठी आपण एखाद्या परदेशी व्यक्तीचे चालकसुद्धा होऊ शकतो हे दाखवण्याच्या नादात इम्रान खान यांच्या ब्रेक फेल झालेल्या गाडीने देशाचा अपघात घडवला. आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेला देश आणि महागाई, बेरोजगारीने पिचलेली जनता ही पाकिस्तानची नवीन ओळख बनली आहे. अशा प्रकारचा ढासळलेला देश चालवणे शक्य नसल्याने इम्रान खान यांना पदच्युत व्हावे लागले आहे. जीवावर बेतणाऱ्या हल्ल्यानंतर ते थोडे थंड झाले आणि लष्कराच्या कह्यात मुकाट्याने विसावले. पण आता देश चालवणे ही सोपी बाब राहिलेली नाही. याची जाणीव तिथल्या लष्करशाहीलासुद्धा आहे. आपलाच आब राखायचा असेल तर एक बाहुला पुढे करून लोकांना शांत केले पाहिजे अशी काही रणनीती हे लष्कर्ष आखत असतील तर नवाज शरीफ यांचे पाकिस्तानात पाऊल पडले म्हणजे तो बाहुला हाच असावा, असे मानण्यासही जागा आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच काळात स्वतंत्र झालेले दोन देश. देशावर आधारित आणि विशिष्ट धर्माचा पुरस्कार करणारा पाकिस्तान आणि लोकशाही व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवणारा, विविध जाती धर्म आणि पंथांना एका छत्राखाली घेऊन गुण्यागोविंदाने नांदणारा भारत या दोन देशांची तुलना केली तर जगाला फरक सहज समजतो. पाकिस्तानात गेल्या 77 वर्षात किती सत्तांतरे झाली आणि लष्कराच्या हातचे बाहुले म्हणून किती नेत्यांना नाचवले गेले याचा इतिहास सगळे जग जाणते. देशावर विशिष्ट विचारांचाच पगडा असला पाहिजे. या आग्रहाखातर आणि आपले बस्तान उध्वस्त होऊ द्यायचे नाही म्हणून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहुतांश जमीनदार असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या या देशात प्रमाणापेक्षा अधिक हस्तक्षेप आहे. पाकिस्तानमध्ये काही झाले तरी ते आपल्या मर्जीने झाले पाहिजे अशी भावना असणाऱ्या या तथाकथित उच्च कुलीन जमीनदारांनी या देशाला नको तितके पिळले आणि छळले आहे. लोकशाही व्यवस्थेचा मनापासून तिरस्कार करणारे लष्करशहा पिकवणारी अशी ही पाकिस्तानातील पंजाबची भूमी. इथले अनेक हुकूमशहा संपूर्ण देशाच्या मुळावर उठलेले जगाने पाहिले आहेत. त्यांच्या सणकीपणामुळे त्यांचे शेजाऱ्यांशी पटत नाही. एखादा राज्यकर्ता लोकप्रिय व्हायला लागला की तो जगावा असे त्यांना वाटत नाही. जरा कुठे देशाचा गाडा रुळावर येतोय असे दिसले की तिथल्या प्रमुखाला बाजूला सारायचे कारनामे लष्कराच्या आणि अतिरेक्यांच्या मदतीने केले जातात. प्रसंगी याच देशात देशाच्या प्रमुखाला फासावर लटकवले गेले आणि भर रस्त्यात गोळ्या घालून मारले गेले तेव्हाही त्यात लष्कर आणि होऊ घातलेल्या लष्करशहा यांचा त्यामागे हात असावा ही शंका पुढे खरी ठरल्याचे दिसले आहे. पाकिस्तानात नवाज शरीफ तर भारतात अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्या काळात खरेतर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध कायमचे सुधारण्याची आणि सीमेवरील तणाव संपवून दोन्ही देशांना सहमतीने प्रगती करण्याची संधी चालून आली होती. वाजपेयी समझोता एक्सप्रेस घेऊन पोहोचले होते. पण, पाकिस्तानी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ त्यावेळी भारतात कारगिल मार्गे घुसखोरी करून काश्मीर काबीज करण्याचे मनसुबे रचत होते. हे कारनामे उघड व्हायला वेळ लागला. परिणामी युद्ध अटळ बनले आणि भारतीय सैन्याच्या ताफ्यातील बोफोर्स तोफांच्या धडाडीने या युध्दाचे चित्र बदलले. भारतीय सैन्य दलाने कारगिलवर पुन्हा तिरंगा फडकवला. त्यानंतर मुशर्रफ सत्तेवर आले. हेकेखोरीमुळे त्यांना आयुष्यात यशस्वी होता आले नाही. अलीकडच्या काळात त्यातल्या त्यात जर कोणाची कारकीर्द चांगली घडली असेल तर ती नवाज शरीफ यांचीच होती. भाजपच्या पूर्वसुरींचे अनुसरण करत पंतप्रधान मोदी यांनी विमानाची वाट वळवून पाकिस्तानात जाऊन शरीफ यांचा वाढदिवस साजरा केला होता. पण तेव्हाही पाक सैन्याची पोटदुखी उफाळून उठली. कथित भ्रष्टाचार जो पाकिस्तानच्या कोणाही नेत्याला किंवा लष्कर प्रमुखाला नवा नाही त्यांनी शरीफ यांच्यावर देश सोडायची वेळ आणली आणि आता त्यांना पुन्हा एकदा परत आणावे लागले आहे. आता तरी त्यांची कारकीर्द योग्य पद्धतीने घडणार की पुन्हा त्यांना पुढे करून जुने खेळ खेळले जाणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पाकिस्तान सावरणे जितके अवघड आहे तितकेच त्याची नव्या पद्धतीने वाटचाल होणे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नियमांना मानून कामकाज करणेही मुश्किल आहे. सतत बंड होते. अशा ठिकाणी पुन्हा तोच बाहुला खेळवल्याने जग त्याकडे किती विश्वासाने पाहणार हा प्रश्नच. तसे तर आपल्याकडे आज दसऱ्याचा दिवस. सोने घ्या सोन्यासारखे रहा सांगून आपट्याची पाने दिली तरी ती आपण सोने म्हणून स्वीकारतो. पाकिस्तानात त्यांनी जगाच्या हातावर जे पान ठेवायचा विचार केला आहे त्याला लोक, जग सोने मानणार का? हा प्रश्नच आहे.
Previous Articleबंगालच्या उपसागरात ‘हामून’ चक्रीवादळ
Next Article अफगाणसमोर पाकिस्तानचे लोटांगण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








