देसूर, तारिहाळ, धामणे, देसूर, नंदिहळ्ळी, कंग्राळी बुद्रुक, अलतगा येथे दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद : युवक-युवतीसह बालचमूंचा सहभाग : सर्वत्र चैतन्याचे वातावरण
वार्ताहर /किणये
तालुक्यात रविवारपासून नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली आहे विविध गावातील मंदिरांमध्ये रविवारी घटस्थापना करून या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. मंदिरांमध्ये ग्रंथ वाचन, हरिपाठ, भजन, प्रवचन आदी कार्यक्रम सुरू झाले आहेत. यामुळे गावांमध्ये भक्तिमय वातावरण दिसून येत आहे. ग्रामीण भागात नवरात्र उत्सव विविध प्रकारे व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. अनेक गावांमध्ये वेगवेगळी परंपरा आहे. गावातील ग्रामदैवत असलेल्या मंदिरांमध्ये रविवारी सकाळी हक्कदार पुजारी व पंच कमिटीच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच विद्युत रोषणाई केली असून फुल हारांची सजावटी केली आहे. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बहाद्दरवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिरात नवरात्र उत्सवाला रविवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. ब्रम्हलिंग पिंडीचे पूजन बाळाराम पाटील यांनी केले .तर घट पूजन ह.भ.प. भोमानी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभावती कल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते तुळस पूजन करण्यात आले. ह.भ.प. भरमानी नाईक यांच्या हस्ते पखवाज पूजन व श्रीमंत पाटील यांच्या हस्ते ध्वज पूजन करून या नवरात्र उत्सवाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मंदिरात हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मल्लाप्पा पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील आठ दिवसही रोज काकड आरती व मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहेत.
देसूर येथे दुर्गामाता दौडला प्रारंभ
धामणे : देसूर शिवप्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे येथील गणेश मंदिरात गणपतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रेरणामंत्राने आणि दुर्गामाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषात दुर्गामाता दौडला भगवा ध्वजधारक सुनिल लोहार यांनी चालना दिली. ही दौड गावभर फिरून येथील श्री लक्ष्मी मंदिर आवारात पोहचली. या दौडच्या मार्गात सुवासिनींनी ध्वजाला औक्षण केले. लक्ष्मी मंदिर आवारात ध्येयमंत्र झाल्यानंतर ध्वज उतरविण्यात येऊन दौडची सांगता झाली. ही दौड नवरात्र उत्सवात दररोज पहाटे 5.30 वाजता गावातील वेगवेगळ्या भागातून निघणार आहे. आजच्या दौडमध्ये अरुण काळसेकर, उत्तम पाटील, पंकज घाडी, दशरथ वसुलकर, किसन लाड व इतर युवक, युवती, बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तारिहाळ येथे दुर्गामाता दौड
तारिहाळ येथील शिवप्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवात दि. 15 रोजी घटस्थापनेपासून पहाटे 5.30 वाजता दुर्गामाता दौडला येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करुन प्रेरणा मंत्र म्हणण्यात आले. त्यानंतर दुर्गामाता दौडला सुरुवात होऊन ही दौड गावभर फिरून येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर आवारात पोहचली. या दौडमध्ये दुर्गामाता की जय, जय भवानी, जय शिवाजी जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता. विठ्ठल-रखुमाई मंदिर आवारात ध्येयमंत्र होऊन ध्वज उतरविण्यात येऊन दौडची सांगता झाली. या दौडमध्ये पुंडलिक डंगोळी, दत्ता खणगावकर, यलेशी जोगण्णावर, सुधीर खणगावकर, राजू खणगावकर त्याचप्रमाणे गावातील युवक, युवती दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
धामणे परिसरात दुर्गामाता दौडची सुरूवात
ग्रामीण भागातील धामणे, देसूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड, नागेनहट्टी, तारीहाळ या प्रत्येक गावातून प्रतिवर्षाप्रमाणे शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडची सुरुवात उत्साहाने करण्यात आली. दुर्गामाता की जय, जय भवानी जय शिवाजी.. या जयघोषात नवरात्र उत्सवाला रविवारी दि. 15 रोजी घटस्थापनेपासून पहाटे 5.30 वाजता सुरुवात झाली. धामणे विभाग शिवप्रतिष्ठानच्या वतीने येथील कलमेश्वर मंदिरमध्ये देवाचे आणि शस्त्राचे व ध्वजाचे पूजन यल्लाप्पा मनोहर जायाण्णाचे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आरती होऊन प्रेरणामंत्राने दुर्गामाता दौडला सुरुवात झाली. ही दौड संपूर्ण गावभर फिरविण्यात आली. दौडच्या मार्गात ठिकठिकाणी सुवासिनींनी ध्वजाचे पूजन करुन आरती ओवाळली. शेवटी येथील बसवाण्णा मंदिर आवारात ध्वजाचे पूजन बाहुबली पुजारी यांनी केले. त्यानंतर गावचे देवस्की पंच बाबाजी पाटील यांच्या हस्ते ध्वज उतरवून दौडची सांगता झाली. या दौडमध्ये विभागप्रमुख महेश पाटील आणि धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी व अवचारहट्टी येथील युवक व युवती, लहान बालके मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
नंदिहळ्ळी गावामध्ये दुर्गामाता दौड
नंदिहळ्ळी गावामध्ये नवरात्र उत्सवात दुर्गामाता दौडला दरवर्षीप्रमाणे श्री दुर्गादेवी मंदिरपासून पहाटे 5.30 ला सुरुवात होऊन गावभर फिरून ग्रामदेवता श्री लक्ष्मी मंदिर आवारात दौडची सांगता करण्यात आली. या सांगताप्रसंगी संतोष जाधव यांनी नवरात्र उत्सवाचे अध्यात्मिक महत्त्व सांगून देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन या दुर्गादौडमध्ये दररोज सहभागी व्हावे, असे आवाहन केले. त्यानंतर ध्येयमंत्र होऊन निवृत्त सैनिक चंद्रकांत पाटील यांनी दौडचा ध्वज उतरविला. यानंतर दौडची सांगता झाली.
कंग्राळी बुद्रुक येथे दुर्गामाता दौडला उत्साहात प्रारंभ
कंग्राळी बुद्रुक : दुर्गामाता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषात कंग्राळी बुद्रुक येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्यावतीने प्रति वर्षाप्रमाणे रविवारी घटस्थापनेपासून दुर्गामाता दौडला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी कंग्राळी बुद्रुक येथील आजी-माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रामा तारीहाळकर व उपाध्यक्ष अरुण पाटील व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीचे पूजन, श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. दुर्गामाता मूर्तीचे पूजन ग्रा. पं. सदस्या भारता पाटील व अर्चना पठाणे यांच्या हस्ते करण्यात आले. निवृत्त जवान नितिन पवार, शंकर हर्जे, आनंद हुरुडे यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. यानंतर प्रेरणा मंत्र व आरती म्हणण्यात आली. यानंतर माजी सैनिक संघटनेच्या हस्ते दौडला प्रारंभ करण्यात आला. दौड लक्ष्मी गल्ली, नेताजी गल्ली, कलमेश्वर गल्ली, बाहेर गल्ली, चव्हाट गल्ली आदी भागातून फिरुन आल्यावर श्री कलमेश्वर मंदिर आवारात दौडची सांगता करण्यात आली.
यावेळी निरंजन जाधव, रवी चव्हाण, शंकर पाटील, योगेश पवार, किरण कोलत यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे असंख्य धारकरी व बालचमू दौडमध्ये सहभागी झाले होते.
अलतगा येथे दुर्गामाता दौड उत्साहात
अलतगा येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकरी व ग्रामस्थांच्यावतीने रविवारी घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला दुर्गामाता दौडला मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपूजन, दुर्गामाता मूर्तीपूजन, ध्वजपूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, दुर्गामाता की जय, भारत माता की जय अशा घोषणा देऊन परिसर शिवमय केला. यावेळी प्रेरणामंत्र व आरती म्हणण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वज उंचावून दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. दौडमध्ये असंख्य धारकऱ्यांसह बालचमू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









