कराड / प्रतिनिधी :
राज्याच्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची जी भूमिका असेल, तीच माझी भूमिका असणार आहे. खासदार शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमवारी 3 जुलै रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजता कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी ते उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री तथा कराड उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
पाटील म्हणाले की, खासदार शरद पवार हे सोमवारी तीन रोजी कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार असून तेथून ते साताऱ्याला नियोजित कार्यक्रमासाठी जाणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आज दुपारी टीव्हीवर अजितदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याचे पाहिले. राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार जी भूमिका घेतील, तीच भूमिका आपली असणार आहे, असे आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी प्रशांत यादव उपस्थित होते.








