वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या नावाचा आणि छायाचित्रांचा उपयोग करु नये, अशी महत्वपूर्ण सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या संबंधींची याचिका शरद पवार गटाने सादर केली आहे. त्यावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. शरद पवार यांच्या गटाचा अजित पवार यांच्या गटाशी काहीही संबंध नाही. मात्र, अजित पवार गटाकडून शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्र यांचा दुरुपयोग मते मिळविण्यासाठी आणि मतदारांची दिशाभूल करण्यासाठी करण्यात येत आहे. अजित पवार गटाला हे करण्यापासून रोखले जावे, अशी मागणी त्यांनी केली असून याचिकेतही या मागणीचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे.
पवारांची प्रशंसा नको
अजित पवार यांच्याकडून पवारांची तोंडदेखली प्रशंसा केली जात आहे. ही प्रशंसा करण्यामागचा उद्देश केवळ मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आहे. शरद पवारांना अशा वरवरच्या स्तुतीची काहीही आवश्यकता नाही. शरद पवार यांचे छायाचित्रही उपयोगात आणण्याचा त्यांना अधिकार नाही, असा युक्तीवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. ही सुनावणी न्या. सूर्यकांत आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर केली जात आहे. खंडपीठाने अजित पवार गटाला शरद पवार गटाच्या याचिकेवर उत्तर देण्याची नोटीसही दिली आहे.
प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश
अजित पवार गटाने स्वत:हून शरद पवार गट सोडून वेगळी चूल मांडली आहे. अशा स्थितीत अजित पवार गटाने आपल्या स्वत:च्या ओळखीचा उपयोग करावा, अशी तोंडी सूचना खंडपीठाने केली. अजित पवार गटाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ मणिंदरसिंग यांनी युक्तीवाद केला. मात्र, खंडपीठाने अजित पवार गटाकडून स्पष्ट प्रतिज्ञापत्राची मागणी केली. शरद पवार यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा उपयोग निवडणुकीसाठी कोणत्याही स्वरुपात किंवा कोणत्याही निमित्ताने केला जाणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
जाहीर नोटीस द्यावी
शरद पवार आणि माझा आता कोणताही राजकीय संबंध राहिलेला नाही, अशी जाहीर नोटीस अजित पवार देऊ शकतात. या नोटीसीला भरपूर प्रसिद्धी मिळेल अशा प्रकारे ती दिली जाऊ शकते, अशीही सूचना न्यायालयाने अजित पवार गटाला केली. अजित पवार गटाने शरद पवार यांचे छायाचित्र असणारी भित्तीपत्रके तयार केली आहेत. त्यावर घड्याळ हे चिन्हही आहे. हे चिन्ह अजित पवार गटाला मिळाले असले तरी शरद पवारांचे छायाचित्रही त्यासोबत प्रसिद्ध करुन अजित पवार गट मतदारांना भ्रमित करत आहे, अशी मांडणी सिंघवी यांनी केली.
मुद्द्याचा विचार
शरद पवारांचे नाव किंवा छायाचित्र उपयोगात आणले जाऊ नये, हा शरद पवार गटाचा युक्तीवाद या मुद्द्यापुरता योग्य आहे. एकदा दोन्ही गटांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर कोणत्याही गटाला एकमेकांची ओळख उपयोगात आणता येणार नाही. आपण शरद पवार यांची छायचित्रे का उपयोगात आणत आहात ? अशी विचारणाही खंडपीठाने अजित पवार गटाच्या विधीतज्ञांना केली आहे.
कार्यकर्त्यांना आवर घाला
शरद पवार यांची छायाचित्रे जर अजित पवार यांचे कार्यकर्ते उपयोगात आणत असतील, तर या गटाने आपल्या कार्यकर्त्यांना तसे करण्यापासून रोखावयास हवे. कारण अशा कृत्यांमुळे मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकते, असेही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी प्रसंगी नोंदविले आहे.
अजित पवार गटाला विचारणा
- शरद पवार यांच्या छायाचित्रांचा उपयोग का ? अजित पवारांचा विचारणा
- कार्यकर्ते उपयोग करीत असतील तर त्यांना अजित पवार यांनी रोखावे
- राष्ट्रवादीचे दोन्ही गट आता वेगवेगळे झाल्याने त्यांची ओळखही वेगवेगळी








