ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मी जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, माझ्या निर्णयानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र भावना उमटल्या. माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. त्यामुळे मी माझा निर्णय मागे घेत आहे. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहीन, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.
वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, 2 मे रोजी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनात मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील 63 वर्षांच्या सेवेनंतर या जबाबदारीतून मुक्त व्हावं ही माझी इच्छा होती. पण त्यामुळे जनमाणसांत तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेली जनता यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. आज सकाळीच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या निवड समितीने माझा राजीनामा एकमताने नामंजूर केला होता.
माझ्यावर प्रेम करणारे असंख्य चाहते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या आग्रहानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मी मागे घेत आहे. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारले तरी कोणतही जबाबदारीचं पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.









