आमदार महेश शिंदे यांचा थेट हल्लाबोल,
प्रतिनिधी/ सातारा
सर्वसामान्यांना शिक्षणाचे कवाडे खुले करणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावंलबी शिक्षण उभे केले. त्यांच्या शिक्षण संस्थेची नियमावली काय सांगते. 1987 साली संस्थेत राजकारण शिरले ते आजतागायत राहिले आहे. एकाच कुटुंबातील सात सदस्य कार्यकारणीत कसे?, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विक्रेद्रीकरण करा म्हणून सांगितले होते. पण यांनी तर सत्तेचे केंद्रीकरण केलेले आहे. जरा जरी स्वाभिमान असेल तर पवारसाहेब संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, असा आमदार महेश शिंदे यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवला.
आयोजित पत्रकार परिषदेत आमदार महेश शिंदे बोलत होते. यावेळी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार महेश शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीने जिह्याचा विकास रखडवला आहे. नुसत्याच घोषणा आणि नुसतेच भूमिपूजन करुन डांगोरा पिटला गेला आहे. जिह्याचे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेजारच्या जिह्यातील नेत्यांनी जिह्यावर अन्याय केला आहे. मेडिकल कॉलेजची नुसती खोटी भूमिपूजन व टाईमपास करत जनतेला भुलवले आहे. सातारच्या मेडिकल कॉलेजला अडीच वर्षात एक रुपयाचाही निधी दिला गेला नाही, असा आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.
मागील सरकारच्या काळातील रखडलेले जिह्यातील सर्व प्रकल्प आता मार्गी लागणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेडिकल कॉलेजसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देतील आणि लवकरच त्याचे काम सुरु होईल. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी शासनाने सातारा जिह्यासाठी काही केले नाही. त्यांचा खोटा कळवळा आणि त्यांची खोटी भूमिपूजन यातच बराचसा वेळ गेला. जिह्यातील महत्वाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांनी एकही रुपयाही दिलेला नाही.
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाच्या प्रश्नाबाबत आमदार महेश शिंदे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री असले पाहिजेत. रयत शिक्षण संस्था ही सर्वसामान्यांची आहे. 1987 सालापासून एकाच व्यक्तीच्या हाती सत्ता आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार हे संस्था बळकावण्याचे नव्हते. मागील काळात काही लोकांनी रयत शिक्षण संस्था बळकावण्याचे काम केले आहे. रयत शिक्षण संस्थेबाबत तेच झाले आहे. एकाच कुटुंबातील साधारण सात सदस्य या संचालक मंडळात आहेत. हे सदस्य होण्याचे पात्र नसतील ते अध्यक्ष व उपाध्यक्ष कसे आहेत, असा थेट नाव न घेता पवार कुटुंबियांच्यावर आरोप केला. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे खरे पाईक असून ते आमच्या मागणीचा विचार करुन कधी तरी राजीनामा देतील आणि मुख्यमंत्री कधीतरी या संस्थेचे अध्यक्ष होतील. मात्र, तत्पूर्वी या संस्थेमध्ये बरेचसे गैरप्रकार आमच्याकडे आले आहेत. पवारांनी गुंड, मवाली, या संस्थेच्या कार्यकारणीत घुसवण्याचे पाप केले आहे, असाही आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला.
100 रुपये कोण देत असेल तरी घ्या अन् भाजपात या
आमदार शशिकांत शिंदे यांना भाजपाकडून 100 कोटींची ऑफर प्रवेशासाठी केली होती त्याबाबत तुमचे काय मत यावर आमदार महेश शिंदे म्हणाले, 100 कोटीच काय तुम्हाला कोण 100 रुपये देत असेल तर तुम्ही तत्काळ भाजपामध्ये या. तुम्ही भाजपामध्ये आला तर तुमचे स्वागत आहे. राजकीय पुनर्वसन कसे करायचे हे वेळ आल्यावर बघू. सध्या तरी ते राष्ट्रीयस्तरावरचे नेते आहेत, अशीही फिरकी घेतली.








