राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापनदिनी पक्षात फेररचना : सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष
प्रतिनिधी / नवी दिल्ली, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली येथील वर्धापनदिनाच्या कार्यक्रमप्रसंगी पक्षामधील नव्या बदलाची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी
केली. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
अजित पवारांकडे कोणतीच जबाबदारी नाही
प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करताना सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील तटकरे यांच्याकडे ओडिशा, पश्चिम बंगाल, शेती, अल्पसंख्याक या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांना बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, कामगार या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवारांना मात्र कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवली
शरद पवारांनी चेंबूर येथील सभेत भाकरी फिरवण्याची वेळ आलीय जर ती वेळीच फिरवली नाही तर करपू शकते असे म्हणत एक इशारा दिला होता. त्यानंतर ‘लोक माझे सांगाती‘ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. शरद पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. तरुण कार्यकर्त्यांचं सलग आंदोलन, देशभरातील विरोधी पक्षाच्या बड्या नेत्यांची विनंती यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापनदिन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन आहे. पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अजित दादांना पक्षाच्या नव्या फेररचनेत डावलेले ?
गेले काही दिवस अजित पवार यांच्याबद्दल निर्माण झालेले संशयाचे वातावरण राष्ट्रवादी पक्षातील त्यांचा दबदबा कमी करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या कार्यकारिणीच्या फेररचनेत अजित पवार यांना कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षातील इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. मात्र, यामध्ये अजित पवारांना स्थान नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राजकीय जाणकारांचे चर्वितचर्वण
राष्ट्रवादीच्या फेररचनेत शरद पवारांनी अजित पवारांचे पंख छाटले की त्यांचा पक्षातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा केला, याबाबत आता चर्वितचर्वण सुऊ झाले आहेत. अजित पवारांची पक्षातील ताकद कमी करण्यासाठी शरद पवारांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
जबाबदारी महत्त्वाची : प्रफुल्ल पटेल
पक्षाकडून मला मिळालेली जबाबदारी पार पाडणे जास्त महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्षाची मान्यता रद्द केल्यानंतर पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. यामुळे पक्षाला राष्ट्रीय दर्जा परत मिळवून देणे हे पहिले आव्हान आहे. हा दर्जा परत मिळवून देणे ही पक्षातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण आम्ही पुन्हा प्रगतीच्या मार्गावर नक्की येणार असल्याचा दावाही यावेळी पटेल यांनी केला आहे.
विश्वास सार्थ ठरविण्यास कटिबद्ध : सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्ष संघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारीबद्दल पवारसाहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेत्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.