बारसूमधील माती परीक्षणाचे काम बाजूला ठेऊन त्यापुर्वी सरकारने स्थानिकांशी चर्चा करूनच त्या संबंधातील निर्णय घ्यावा असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केल्याने वाद निर्माण झाला. राजकीय वर्तुळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दोघांनी पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी शासनाला हा सल्ला दिला आहे.
उद्योगमंत्री उदय सावंत यांच्याबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, “बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिकांविरोधात पोलिसांकडून बळाचा वापर केला जात आहे अशा प्रकारची तक्रार येत आहे. त्याबाबत मी आज उद्योगमंत्र्यांकडून माहिती मागवली असून अशा कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचं त्यांनी सांगितले आहे. बारसूमध्ये रिफायनरी प्रस्तावित असून सध्या येथील माती परीक्षणाचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. स्थानिकांचा विरोध असेल तर हे काम थांबवून प्रकल्प विरोधक आणि शासकीय कर्मचाऱ्यांची बैठक घेण्याची विनंती मी त्यांना केली आहे. यावर उद्योगमंत्र्यांनी बारसूमध्ये यासंदर्भात उद्या बैठक घेऊन स्थानिकांचे प्रश्न समजावून घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.” असा खुलासा शरद पवार यांनी दिला आहे.