ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार (Ashish Shelar) यांना पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नवं समीकरण जुळतंय की काय, अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आज खुद्द पवार यांनी खुलासा केला आहे.
एका पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, आशिष शेलार हे याआधीही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. काही क्षेत्रं अशी असतात, जिथे राजकारण आणायचं नसतं. क्रिकेटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही राजकारण आणत नाही. खरंतर लोकांना हे माहिती नाही की मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी होते. मोदी माझ्या बैठकीला हजर होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हाच अरुण जेटली दिल्लीचे तर आत्ता केंद्रीय मंत्री असलेले अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष होते. त्यामुळे मी देशाचा अध्यक्ष आणि हे सगळे राज्यांचे अध्यक्ष असं आम्ही सर्वांनी तेव्हा एकत्र काम केलं. तेव्हा लोकांना ते लक्षातही आलं नाही. पण यावेळी त्याची चर्चा सुरू झाली. तात्पर्य एकच, की या ठिकाणी राजकारण आणायचं नाही’, असं म्हणत पवारांनी या विषयाला पूर्णविराम दिला.
अधिक वाचा : राज्यातील पोलीस भरती लवकरच, पुण्यातून 800 जणांना संधी