दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जग उभं झालं असताना शरद पवार मोदीजीवर टीका करून पलेस्टाईनच्या बाजूने बोलत आहेत. शरद पवार यांनी मतांच्या राजकारणाकरिता आपली पातळी उतरली आहे. शरद पवार हे दहशतवादाचं समर्थन करत आहेत हे त्यांच्या बोलण्यावरून कळत असल्याची टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
रत्नागिरीच्या दौऱ्यावर असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माघ्यमाशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इस्त्राय़ल- पॅलेस्टाईन युद्धात पॅलेस्टाईन ची बाजू घेतल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, “शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात बाँबब्लास्ट झाले तसेच इतर दहशतवादी कृत्येही या महाराष्ट्रात झाली. आजही शरद पवार त्याच बाजूने आहेत. शरद पवार साहेबांना हे कळलं पाहिजे कि, दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जग उभं झालं आहे. शरद पवार मोदीजींवर टीका करताहेत. पलेस्टाईनच्या बाजूने बोलताहेत. मताच्या राजकारणाकरिता एखाद्याने अजून किती खाली जायचं. दहशतवादाचं किती समर्थन करायचं हे शरद पवार यांच्या बोलण्यावरून कळतं.” अशी टिका त्यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील गुप्त बैठकीवर भाष्य करताना ते म्हणाले, “राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असले तरी, आमदार म्हणून त्यांचा एक वेगळा रोल आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही जातो तेव्हा आमदार म्हणूनच जातो.” असे ते म्हणाले.
जरांगे पाटलांचे आंदोलन सामाजिक…राजकिय नाही
यावेळी बावनकुळे यांनी म्हटले आहे कि, “सर्वांचं मत आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा आरक्षण जाण्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे झोपले होते, त्यांनी केंद्र सरकारने फॉलोअप केला नाही, गेलेच नाही तर प्रस्ताव मंजूर कसा करणार. जरांगेंच्या दौऱ्याला सरकारने खऱ्या अर्थाने मदतच केली पाहिजे. जरांगेचे आंदोलन हे सामाजिक आंदोलन असून राजकीय आंदोलन नाही.” असेही त्यांनी म्हटले आहे.