ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर आता सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सारवासारव केली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. शरद पवारांना कमी लेखण्याचा किंवा त्यांच्याविषयी काही चुकीचं बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते आमचे नेते आहेत आणि भविष्यातही राहतील, असे स्पष्टीकरण वळसे-पाटील यांनी दिले आहे.
वळसे-पाटील म्हणाले, माझं संपूर्ण भाषण जर ऐकलं तर लक्षात येईल की मी शरद पवारांविषयी असे उद्गार काढलेले नाहीत. माझं म्हणणं असं होतं की गेली 40 ते 50 वर्षे शरद पवारांनी या राज्यासाठी, देशासाठी काम केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत. मात्र, महाराष्ट्रातल्या जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही. त्यांना राज्यात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही, अशी खंत मी व्यक्त केली होती. त्यात शरद पवारांना कमी लेखण्याचा किंवा काही चुकीचं बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
मीडियाने माझ्या वक्तव्याने विपर्यास केला, याची खंत ही यावेळी वळसे पाटलांनी बोलून दाखवली.








