अर्चना घारे २६ तारीखला दिल्लीत !
न्हावेली / वार्ताहर
रखडलेले सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यात आपण खुद्द लक्ष घालू असे आश्वासन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे. याबाबत दिल्लीत रेल्वेमंत्र्यांशी २६ तारीखला ते चर्चा करणार आहेत. त्यासाठी अर्चना घारे यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती खुद्द सौ .अर्चना घारे यांनी दिलीअसून आपण खासदार विनायक राऊत यांना घेऊन त्याठिकाणी जाणार आहे . दरम्यान यावेळी नियोजित बांदा-संकेश्वर हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जावा याबाबत सुध्दा श्री पवार यांचे लक्ष वेधणार आहे असे त्यांनी सांगितले .
सावंतवाडी-मळगाव येथे रेल्वे टर्मिनस मंजूर झाले. त्याचे काही अंशी काम झाले. परंतू, त्यानंतर या कामाला पुढे गती मिळालेली नाही. यातील बरेचसे काम अर्धवट स्थितीत आहे . त्यामुळे टर्मिनस मंजूर असून सुध्दा कोणताही फायदा सावंतवाडीला झालेला नाही. दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरु होण्याच्या धर्तीवर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता . यावेळी सावंतवाडीत वंदे भारतला थांबा देण्यात यावा , अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सौ .घारे यांनी खासदार सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून हा प्रश्न पक्षाध्यक्ष पवार यांच्याकडे मांडला. यावेळी हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे त्यामुळे तू दिल्लीत ये आपण त्या ठिकाणी रेल्वेमंत्र्याशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन पवारांनी आपल्याला दिल्याचे घारे यांचे म्हणणे आहे .
ही बैठक २६ जूनला दिल्लीत होणार आहे त्यासाठी खासदार विनायक राऊतांना बोलविण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही दोघे तसेच पक्षातील महत्वाचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत. असे घारे यांनी सांगितले. याच चर्चेदरम्यान नियोजित बांदा-संकेश्वर हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जावा यासाठी पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी आपण श्री पवार यांच्याकडे करणार आहे असे घारे म्हणाल्या .









