ऑनलाईन टीम / मुंबई :
अजित पवार गटाने काल शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर आज पुन्हा हा गट पवारांच्या भेटीसाठी वाय. बी. चव्हाण सेंटरवर पोहचला. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला. शरद पवार यांनी भाजपसोबत जाता येणार नाही, हे आगोदरच स्पष्ट केलं आहे. तरी देखील अजितदादा गट पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी आता पवारांना गळ घातलो, हे बरोबर नाही, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाल्या, अजित पवार गटाने आपल्या मनात मोदींची प्रतिमा तयार केली आहे. त्यांना शरद पवारांविषयी प्रेम राहिलेलं नाही. शरद पवार त्यांच्या ह्रदयात असते तर त्यांनी बंडखोरी केलीच नसती. आता सगळं संपलं असताना त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणे, पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी गळ घालणे असे प्रकार सुरू आहेत. पवारांना अशा प्रकारे त्रास देणे योग्य नाही. त्यांना मोदींसोबत जाता येणार नाही, हे त्यांनी आगोदरच स्पष्ट केले आहे.
सर्वधर्म समभाव मानणारे पवार मोदींसोबत जाणे शक्य नाही. त्यामुळे एकत्र येण्यासाठी विनंती करून काय साध्य होईल असे वाटत नाही. बंडखोर आमदारांनी आपण पवारांच्या नावावरच निवडून आलोय, हे विसरु नये, असेही त्या म्हणाल्या.








