म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने पुण्यात घेतली भेट
बेळगाव : बेळगावसह सीमाभागात मराठी शाळांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे. शिक्षकांची कमतरता, नव्या इमारती बांधकामाकडे दुर्लक्ष यामुळे मराठी माध्यमात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याने महाराष्ट्र सरकारने मराठी शाळांकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीयमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. पुणे येथे पवार यांची भेट घेऊन बेळगावच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शरद पवार यांनी बेळगावमधील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. याबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. म. ए. समितीची वाटचाल आणि सीमाप्रश्न यासंदर्भात चर्चा झाली. कंग्राळी बी. के. येथील शाळेच्या प्रश्नासोबतच इतर विषय मांडण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस इंजिनिअरिंग सेलचे अध्यक्ष अमित देसाई यांच्या नेतृत्वाखाली पवार यांची भेट घेण्यात आली. यावेळी चंद्रकांत कोंडुस्कर, श्रीधर अळवणी, मयुर बसरीकट्टी, शंकर कोनेरी, राजू मनोळकर, दिनेश जगताप यासह इतर उपस्थित होते.









