पुणे / प्रतिनिधी :
दोन-चार दिवसांमध्ये मी भूमिका बदलली असे देवेंद्र फडणवीस म्हणतात, तर मग देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांत शपथ का घेतली? काय कारण होते? पहाटे चोरुन शपथ का घेतली? फडणवीसांना पाठींबा नाही, याची खात्री होती तर, हे करायची काय आवश्यकता होती? पहाटेचा शपथविधी घेतल्यानंतर आमचा पाठिंबा होता म्हणता, तर दोन दिवसांपेक्षा जास्त काळ सरकार राहिले का? असे प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांचे गुरुवारी खंडन केले. दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली आणि सत्तेसाठी ही मंडळी काही करू शकतात, हे समाजासमोर यावे, यासाठी काही गोष्टी आम्ही केल्या. आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असा उपरोधिक टोलाही शरद पवार यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करताना शरद पवार यांनी आमच्यासोबत डबलगेम केला, असे म्हटले होते. पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता. पण नंतर त्यांनी ऐनवेळी पाठ फिरवत डबलगेम केला, असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट भूमिका मांडली.
पवार म्हणाले, २०१४ चा विषय तुम्हाला आठवतोय का? त्यावेळी निवडणूक झाल्यानंतर आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, नंतर तसा पाठिंबा द्यायची वेळ आली नाही. आम्हाला काही फडणवीसांचे कौतुक नव्हते. पण त्यांच्यात आणि त्यांच्या मित्रामध्ये (शिवसेना) कसे अंतर पडेल, यासाठी आम्ही ते केले. त्यानंतरच्या काळात जे सांगितले, की भेट झाली ती गोष्ट खरी आहे. त्यानंतर ते स्वतःच म्हणाले, की दोन दिवसात शरद पवारांनी भूमिका बदलली. आम्ही फसवले, असे आता फडणवीस म्हणत आहेत. माझा प्रश्न आहे फसले का? उद्या मी तुम्हाला सांगितले, की तुम्हाला गव्हर्नर करतो, या शपथ घ्यायला, तर लगेच शपथ घ्यायला याल का? मोदींचा यात काही संबंध नाही. सत्तेशिवाय करमत नव्हते, ते राज्यातले नेते होते. भेट झाली होती. मी याआधीही सांगितले. आजही भेटलो होतो त्याचा अर्थ असा होत नाही की अशा काही गोष्टी असतात. सत्तेशिवाय त्यांची अस्वस्थता होती, ती लोकांसमोर आणली. आमच्या चर्चा सगळ्या झाल्या. काही करुन त्यांना आमची मदत हवीच होती. त्यामुळे चर्चा झाल्याशिवाय गोष्टी घडतात का? असेही पवार म्हणाले.
गुगली बॉलवर विकेट दिली, तर काढायची नाही का?
“तुम्हाला जो काही अर्थ काढायचा आहे तो काढा. हा डाव होता की नाही मला माहीत नाही. माझे सासरे सदू शिंदे हे क्रिकेटर होते. ते गुगली बॉलर होते. त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या विकेट घेतल्या होत्या. मी क्रिकेट खेळलो नाही ल, परंतु,मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठे टाकायचा? हे माहिती होते. यापेक्षा जास्त मला काही विचारु नका. विकेट दिली तर करायचे काय? विकेट घेतलीच पाहिजे”, अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी केली.
समान नागरी कायद्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असली पाहिजे
पंतप्रधान नरेंद्र मोदी समान नागरी कायद्यावर काल बोलले. याबाबतची भूमिका स्पष्ट करताना पवार म्हणाले, की याबाबत निती आयोगाने प्रस्ताव मागवले होते, अनेक अहवाल आले आहेत. पण ते अहवाल लोकांसमोर ठेवले नाहीत. यात नेमक्या काय सूचना आहेत? हे निती आयोगाने समोर ठेवले पाहिजे होते. यात सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. समान नागरी कायद्याबाबत शीख आणि जैन समाजाची भूमिका स्पष्ट करावी. संपूर्ण माहिती घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस समान नागरी कायद्याबाबत भूमिका घेईल. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधानांचे प्रयत्न सुरु आहेत का ? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.
त्यावेळी फडणविसांनी काय केलं?
“मोदी शिखर बँकेबद्दल बोलले. पण मी कोणत्याच बँकेतून कधी कर्ज घेतले नाही. शिखर बँक सोडा, मी कोणत्याच इतर बँकेतून कर्ज घेतले नाही. शिखर बँकेसंदर्भात मागे एकदा तक्रार झाली होती. चौकशी झाली होती”, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या काही लोकांची नावे आली. भाजपमधील काही लोकांची नावेआली. त्यावर चौकशी करण्याची जबाबदारी राज्यावर होती. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्या सबंध काळात त्यांनी काय केले, मला माहिती नाही. शिखर बँकेचा उल्लेख करण्याची गरज होती का, ते मला माहिती नाही. अशा कुठल्याही संस्थेशी आमचा संबंध नाही”, अशा शब्दांत शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
महिला आणि मुली यांच्यावरील हल्ल्याच्या घटना वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मी महाराष्ट्रातील काही ठिकाणांची अधिकृत माहिती सरकारकडून मिळवली आहे. मला सर्व महापालिकांची माहिती मिळाली नाही. पण पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूरची माहिती मिळाली. २३ जानेवारी ते २३ मे या कालावधीत पुण्यातून ९३७ मुली अथवा महिला या बेपत्ता आहेत. ठाणेमधून ७२१ बेपत्ता आहेत. मुंबईतून ७३८ आणि सोलापूर ६२ बेपत्ता आहेत. हा सगळा आकडा २४५८ आहेत. आणखी काही ठिकाणांची माहिती मी अधिकृत मिळवली. यामध्ये बुलढाणा, धुळे, पुणे ग्रामीण, वाशिंद, अमरावती, जळगाव, भंडारा, रत्नागिरी आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण एकूण ४४३१ मुली-महिला या बेपत्ता आहेत. २२ आणि २३ या कालावधीत पोलीस आयुक्तालयात, पोलीस अधिक्षक या ठिकाणी दीड वर्षाच्या काळात एकत्र महिलांची संख्या ६८८९ आहेत. एवढ्या मुली-महिला बेपत्ता होतात. मिळू शकत नाहीत. मला वाटते गृहमंत्र्यांनी बाकीचे वक्तव्य करण्यापेक्षा बेपत्ता महिला आणि मुलींना शोधले पाहिजे. या महिलांना शोधून त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधिन करण्याची जास्त आवश्यकता आहे, असेही त्यांनी सुनावले.








