Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt : राज्यातील सत्ताधारी सत्तेचा आणि पदांचा गैरवापर करत असून विरोधकांना डाऊन करण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे. अनिल देशमुख आणि संजय राऊतांना जामीन देताना कोर्टानं जे म्हटलं आहे, त्यातून सत्ताधाऱ्यांनी काही तरी शिकलं पाहिजे, असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला. आज पुण्यात पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोर्टानं विरोधी पक्षाच्या नेत्यांना जामीन देताना सरकारचा दृष्टीकोन चुकीचा असून यातून सत्ताधाऱ्यांनी योग्य तो बोध घ्यावा.सत्तेचा गैरवापर करत संजय राऊत आणि अनिल देशमुखांना अटक करण्यात आली होती. अजूनही विरोधी पक्षाचे काही लोक जेलमध्ये असून त्यांनाही जामीन मिळेल. कारण जामीन हा त्यांचा हक्क असून ज्या कारणासाठी नेत्यांना अटक करण्यात आली आहे, त्या प्रकरणात फारसं काही नसल्याचा निष्कर्ष कोर्टानं काढला आहे, असेही ते म्हणाले. सूडबुद्धीनं विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, केंद्र सरकार संसदेत बजेट सादर करेल तेव्हा त्यातून सरकारची देशासाठी नीती काय आहे, हे लक्षात येईल. त्यामुळं केंद्र सरकारनं देशाचा विचार करून आणि संसदेचं मूल्य लक्षात घेऊनच पावलं टाकावीत असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
Previous Article२०२२ मध्ये ‘या’ होत्या ट्रेंडिंग साड्या
Next Article रंकाळ्याजवळ जेसीबीखाली सापडून महिला ठार








