Shard Pawar In Kolhapur : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत बनवलेल्या माहितीपटावर बंदी घालणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. धार्मिक मुद्द्यावर लोक मतदान करणार नाहीत. राज्यपालांनी राजीनामा दिला बरं झालं महाराष्ट्राची सुटका होतेय, नवीन राज्यपाल कोण येणार हे माहीत नाही. मात्र आताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ती चांगली गोष्ट आहे. अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. आज ते कोल्हापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर चर्चा केली. तसेच आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जनमत चाचणीच्या आकडेवारीनुसार आता लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक फटका बसणार असल्याचं दिसून आलं आहे. बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांच्यासोबत राहणार नाही, असं चित्रं या सर्व्हेतून दिसतंय, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.
मविआचा शपथविधी पहाटे झाला यावरून सत्ताधारी सतत टीका करत असतात यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे होऊन गेली कशाला काढायचा तो प्रश्न. सत्ताधारी मंडळींच्या विरोधात जनमत आहे, सर्व्हेमधून असंच दिसत आहे. विरोधकांची एकी करण्याचा प्रयत्न आहे पण अजून कोणताही पक्का निर्णय झाला नाही. प्रत्येक राज्यात वेगवेगळे इशू आहेत ते सोडवावे लागतील. विरोधकांचा डायलॉग दिल्लीत सुरू होईल. कर्नाटकात भाजपचे राज्य राहणार नाही असं आता दिसत असल्याचे ही ते म्हणाले.
आगामी निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत. आमची अजून वंचीत बाबत चर्चा झाली नाही.आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत आमच्यात समन्वय आहे, काही काळजी करू नये. लोकप्रतिनिधी फोडण्याची पावलं शिंदे गटाकडून जास्त दिसत आहेत. पण हे घडतं असत त्याची जास्त काळजी घेण्याची गरज नाही.
सीमा भागातील बांधवांच्या मागण्या मुख्यमंत्री यांच्या कानावर घालेन. मराठी भागातील नागरिकांच्या पाठीशी सरकारने रहावं. राहुल गांधी यांच्या यात्रेला सामान्य नागरिकांचा पाठींबा दिला. राहुल गांधी यांचं वेगळं चित्र भासवण्याचा प्रयत्न केला होता त्याला हे उत्तर मिळालं असेही ते म्हणाले.
तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचं दिसून येत आहे. पोट निवडणूक बिनविरोध होण्यासाठी चंद्रकांदादा पाटील कुणाला पत्र लिहिणार आहेत माहीत नाही. कोल्हापूरमध्ये देखील पोट निवडणूक झाली होती ना? असा सवाल करत पंढरपूरला झाली होती आताच कसे यांचा सुचलं काही कळत नाही असा सवालही उपस्थित केला.
ममता बॅनर्जी या विरोधी आघाडी राहणार काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, केंद्र सरकार या ना त्या एजन्सीचा वापर करून ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्रास देत आहे, असंही ते म्हणाले.
Previous Articleवन डिचोली येथे आज रथसप्तमी उत्सव नवाब शेख यांचा कार्यक्रम
Next Article क्रांतिवीर दीपाजी राणेंना यापुढे सरकारची मानवंदना








