नवी दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी आयोजन ः ईव्हीएमच्या मुद्दय़ावर चर्चा होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील स्वतःच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलाविली आहे. पवारांनी राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.
या बैठकीत ईव्हीएमच्या मुद्दय़ावर चर्चा होणार आहे. शरद पवार यांच्याकडून या बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याने भाजपविरोधी सर्व पक्ष यात सामील होणार असल्याचे मानले जात आहे. निवडणूक आयोगाकडून यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काही राजकीय पक्षांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला होता, असे शरद पवारांनी स्वतःच्या पत्रात नमूद केले आहे.
पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी 6 वाजता बैठकीस प्रारंभ होणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षांचे नेते स्वतःचे म्हणणे मांडतील. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीकरिता प्रतिष्ठित आयटी तंत्रज्ञ आणि क्रिप्टोग्राफरांकडून व्यक्त करण्यात आलेले विचार जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलाविली असल्याचे पवारांनी म्हटले आहे.
ईव्हीएमवर काँग्रेसही सक्रिय
ईव्हीएमवरून समान विचार बाळगणाऱया पक्षांसोबत सहमती तयार केली जाईल. यानंतर आयोगाने या ईव्हीएमसंबंधी योग्य जबाब न दिल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे काँगेसकडून काही दिवसांपूर्वी म्हटले गेले होते. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या पक्षाच्या महाअधिवेशनात संमत राजकीय प्रस्तावात ईव्हीएमच्या प्रभावीपणावर चिंता व्यक्त केली आहे.









