Sharad Pawar News : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सांगली जिल्ह्यात सुद्धा त्याचे पडसाद उमटत आहेत. जिल्हा पवारांसोबत ठाम आहे मात्र, अजितदादा भाजपसोबत जातील अशी शंका स्वपक्षासोबत इतर पक्षांनाही आहे.जयंतराव शरद पवारांसोबतच राहतील याबाबत सर्वांचे एकमत असले तरी काहींना त्यांना त्रास होईल असेही वाटते.तर काहींनी पासष्ठी गाठल्यानंतर सुद्धा अजितदादांनी किती दिवस ऐकायचे?अशी भूमिका मांडली.जिल्ह्यातील ‘तरुण भारत संवाद’च्या अनुभवी प्रतिनिधींनी विविध स्तरातील नेत्यांशी साधलेला हा संवाद आहे!
अशी ठाम मते मांडणाऱ्या बहुतांश वर्गाबरोबर एक वर्ग असाही आहे ज्यांना पवारांच्या वयानुरूप घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करावे वाटते. काहींना पवारांनी वारसदार आधीच ठरवला असता तर ही वेळ आली नसती असे वाटते. काहींनी अजूनही पक्षात पुढचे नेतृत्व तयार केले जाऊ शकते अशी आशा व्यक्त केली. तर काहींनी पवारांचा राजीनामा अजून मंजूर झालेला नाही ते मागेही घेतील किंवा सर्वांचे एकमत ही घडवतील असे वाटते. राष्ट्रवादी सोडून पूर्वीच इतर पक्षात गेलेल्या नेत्यांनी जिल्ह्यात कुठे जयंत पाटील यांची बाजू घेतली तर काहींनी त्यांनी जिल्ह्यासह राज्यात अनेकांना किंमत न दिल्याने आता त्रास होईल असे मत मांडले. काहींना दादा ठाम आहेत आणि पवारांना त्यांचे ऐकावे लागेल असे वाटते. पक्षातील दादांसह अनेक नेते एक झालेत. जिल्ह्यात आर. आर. आबा परिवार पवारांच्या सोबत आहे. उर्वरित जिल्हा जयवंतराव काय संदेश देतात याच्या प्रतीक्षेत आहेत. खुद्द जयंतरावांशी जवळीक असणाऱ्यांना जनता पक्षात गेल्याने राजारामबापू पाटील यांची झालेली फरपट आठवते. वडीलांच्या राजकारणाकडे पाहून जयंत रावांनी स्थिर राजकारण केले असून त्यांच्यासाठी पवारांचा शब्दच अंतिम असेल असे वाटते. पवारांनी दाखवलेला विश्वास आणि प्रांताध्यक्ष म्हणून सततच्या दौऱ्यातून त्यांना अंदाज आला असून भविष्य महाविकास आघाडीला आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांनी थोडा त्रास सोसावा मात्र पवार जसे ठाम आहेत तसे ठाम रहावे अशी भूमिका मांडत आहेत.
हेही वाचा- शरद पवार कार्यकर्त्यांची समजूत काढताना म्हणाले; …म्हणूनच निवृत्तीची निर्णय घेतला
मात्र, नेमकी याच्या विरुद्ध भूमिकाही मांडली जाते. दादांनी इतकी वर्षे वाट पाहिली आता त्यांना किती रोखणार जे आहे ते अटळ आहे असे समजून सामोरे जावे आणि अडचणीत असलेल्यांना त्यांच्या जबाबदारीवर मुक्त करावे असेही मत काही नेते व्यक्त करीत आहेत.
राष्ट्रवादीत आणि सहकारात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या नेत्यांबरोबर पक्षात परत आलेल्या काही नेत्यांनी पवारांची मनधरणी करून त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष वाटचाल करेल असा आशावाद व्यक्त केला. तर राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांनी आम्ही पवार साहेबांचे बोट धरून पक्षात आलो होतो. त्यांच्याविषयी आम्ही काहीही बोलणार नाही. हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे असे तर काहींनी हा त्यांच्या परिवार अंतर्गत प्रश्न आहे असे सांगून बोलणे टाळले. अशा काळात शरदरावांशी एकनिष्ठ असणाऱ्या विलासराव शिंदे यांच्यासारख्या नेत्यांची मात्र उणीव भासत आहे अशी आठवण काही नेत्यांनी काढली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








