वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेतील दिग्गज उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकिच्या टेस्ला कंपनीने भारतातील प्रमुखपदी शरद अगरवाल यांची नियुक्ती केली आहे. टेस्ला ही कंपनी भारतामध्ये आपल्या इलेक्ट्रीक कार्सच्या विक्रीवर भर देत असून त्याचाच एक भाग म्हणून कंपनीने नव्याने वरील नियुक्ती केली आहे. शरद अगरवाल हे यापूर्वी लंबोर्गिनी इंडियाचे भारतीय प्रमुख म्हणून काम पाहत होते.
या आठवड्यापासूनच अगरवाल हे भारतातील जबाबदारीचे काम हाती घेणार आहेत. टेस्लाचा भारतामध्ये प्रारंभ झाला असला तरी त्यांच्या कार्सना विक्रीत म्हणावा तसा प्रतिसाद वाढताना दिसत नाही आहे. हीच दखल घेऊन कंपनीने वरील नियुक्ती केलेली असून भारतात त्यांच्या इलेक्ट्रीक कार्सच्या वाढीसाठी ते प्रयत्न करतील.
टेस्लाने आपल्या दोन शोरुम्स भारतामध्ये मुंबई आणि दिल्लीत अनुक्रमे जुलै, ऑगस्टमध्ये सुरू केली आहेत. गेल्या मे महिन्यामध्ये यापूर्वीचे भारतीय प्रमुख प्रशांत मेनन यांनी राजीनामा दिला होता. ते भारत आणि अमेरिकामधील विक्री विभागाचे प्रमुख होते.









